पाऊस… खेळ नक्षत्रांचे

6430

>>दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

नक्षत्रावरून अनुमान बांधले जाते आणि ते खरेही ठरते की पाऊस कसा पडणार आहेकाय आहे यामागे विज्ञान

पाणिनीने ‘नक्षत्र’ शब्दाची व्युत्पत्ती ‘न क्षरति’ म्हणजे जे क्षय पावत नाही ते नक्षत्र अशी सांगितली आहे. रात्री निरभ्र काळोख्या आकाशात नक्षत्रांचे मनोहारी दर्शन घडते. नक्षत्रे ही देवांची मंदिरे आहेत. आकाशाच्या बागेत नक्षत्र – तारकांची फुले फुललेली पाहून मन प्रसन्न होते.

सूर्याचा भासमान मार्ग म्हणजे आयनिक वृत्त! या आयनिक वृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांना आपण नक्षत्र असे म्हणतो. (१) अश्विनी (२) भरणी (३) कृत्तिका (४) रोहिणी (५) मृग (६) आर्द्रा (७) पुनर्वसू (८) पुष्य (९) आश्लेषा (१०) मघा (११) पूर्वा फाल्गुनी (१२) उत्तरा फाल्गुनी (१३ ) हस्त (१४) चित्रा (१५) स्वाती (१६) विशाखा ( १७) अनुराधा (१८) ज्येष्ठा (१९) मूळ (२०) पूर्वाषाढा (२१) उत्तराषाढा (२२) श्रवण (२३) धनिष्ठा(२४) शततारका (२५) पूर्वा भाद्रपदा (२६) उत्तरा भाद्रपदा (२७) रेवती अशी या नक्षत्रांची नावे आहेत.

या प्रत्येक नक्षत्र विभागात त्या नक्षत्रातील तारका आहेत. या सर्व तारका आपल्या आकाशगंगेतील आहेत. सूर्य हा आपणांस सर्वात जवळचा तारा आहे. प्रकाशाचा वेग एका सेकंदास तीन लक्ष किलोमीटर एवढा आहे. सूर्यावरून प्रकाशकिरण निघाला की, साडेआठ मिनिटांनी तो पृथ्वीवर येतो. म्हणून सूर्य साडेआठ प्रकाशमिनिटे अंतरावर आहे असे म्हटले जाते.

आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत आहे. आपण जेव्हा दिवसा आकाशात पाहतो त्यावेळी सूर्यप्रकाशामुळे आकाशातील नक्षत्रतारकांचे दर्शन होत नाही, परंतु रात्रीच्या वेळी आपल्या सूर्यमालेतील ग्रह आणि आपल्या आकाशगंगेतील तारकांचे दर्शन होते. आपला चंद्र पृथ्वीसभोवती फिरत असताना या नक्षत्रतारकांच्या समोरून जाताना दिसतो. चंद्र ज्या नक्षत्राच्या समोर येतो ते त्या दिवसाचे नक्षत्र असते. चंद्र साधारणतः चोवीस तासांत एक नक्षत्र ओलांडतो. खरं म्हटलं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, परंतु आपण पृथ्वीवरून पाहत असल्याने सूर्यच आपल्याभोवती भ्रमण करतोय असे वाटते. सूर्य साधारणतः पंधरा दिवस एका नक्षत्रासमोर असतो. अर्थात सूर्य त्या नक्षत्रात असताना सूर्यप्रकाशामुळे त्या नक्षत्रतारका आपणांस दिसू शकत नाहीत. वर्षातील ठरावीक तारखांना सूर्य त्या त्या नक्षत्रात प्रवेश करतो.

पर्जन्य नक्षत्रे

सत्तावीस नक्षत्रांतील मुख्य पाऊस पडण्याची नऊ नक्षत्रे जर कोरडी गेली तर दुष्काळ पडल्याने शून्यच उरेल नाही का? सूर्य जेव्हा मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त या नक्षत्रांसमोर येतो त्यावेळी आपल्याकडे पावसाळा असतो. सूर्य ८ जून मृग, २२ जून आर्द्रा, ६ जुलै पुनर्वसू, २० जुलै पुष्य, ३ आगस्ट आश्लेषा, १७ आगस्ट मघा, ३० ऑगस्ट पूर्वा फाल्गुनी, १३ सप्टेंबर उत्तरा फाल्गुनी आणि २७ सप्टेंबर हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. नेमके हेच दिवस आपल्याकडे पावसाळ्याचे असतात. पुनर्वसूत जोरदार पाऊस पडतो म्हणून त्याला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात संथ, सतत पाऊस पडतो म्हणून या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. मघा नक्षत्रात पुन्हा कडाडत जोरदार पाऊस पडतो म्हणून या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात. हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ असे म्हणतात. देव आकाशात राहतो म्हणतात ते अगदी खरं आहे. कारण सूर्यप्रकाश नसता आणि आकाशातून पडणारा पाऊस नसता तर आपण जगूच शकलो नसतो.

आपली प्रतिक्रिया द्या