दिपन बॅनर्जीच्या हत्येप्रकरणी एक डब्बेवाल्यासह दोघांना जन्मठेप

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

२०१० साली नवी मुंबईतील ऐरोली येथे झालेल्या इंजिनिअर दिपन बॅनर्जीच्या हत्येप्रकरणी मंगळवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने एका डब्बेलाल्यासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विनोद बांदल, सुरज गुरव आणि संतोष राऊत अशी त्या तीन नराधमांची नावे असून त्यांनी जन्मठेपेसोबत प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे.

मूळचा कोलकात्याचा असलेला दिपन बॅनर्जी हा ऐरोली येथील एल अॅण्ड टी कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून कामाला होता. ऐरोलीतच एका इमारतीतील फ्लॅटमध्ये तो एकटा राहायचा. विनोद बांदल हा डब्बेवाला दररोज त्याला डब्बा आणून द्यायचा. दिपन हा एल अॅण्ड टीमध्ये कामाला असल्यामुळे त्याला पगारही चांगला होता. त्यामुळे त्याला डब्बा द्यायला येणाऱ्या विनोद बांदल यांना दिपनकडे बक्कळ पैसा असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी सुरज गुरव आणि संतोष राऊत यांच्या मदतीने दिपनची हत्या करून त्याच्या घरातील सर्व ऐवज चोरण्याचा प्लान बनवला होता. त्यानुसार त्यांनी १० ऑगस्ट रोजी त्यांनी दिपनच्या घरात प्रवेश करून त्याची १७ वेळा सुरा खुपसून निघृणपणे हत्या केली. मात्र दिपनची हत्या करूनही त्यांना त्याच्या घरातून अवघे २५० रुपये मिळाले. या मारेकऱ्यांनी दिपनची हत्या करून त्याचा मोबाईल, लॅपटॉप चोरून नेला. हे तिघेही कराड येथे पळून गेले होते मात्र हत्येचा चार दिवसांतच पोलिसांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या.

आज दिपनला न्याय मिळाला – दिपनची बहिण
माझ्या भावाची हत्या झाली तेव्हा तो फक्त २३ वर्षाचा होता. दिपनला न्याय मिळण्यासाठी मी गेली साडे सात वर्ष प्रत्येक सुनावणीसाठी कोलकात्याहून मुंबईला यायचे. आमचे वृद्ध आई वडील देखील कधी न्याय मिळेल या प्रतिक्षेत होते. आज आम्हाला सर्वांना न्याय मिळाला. दिपनची हत्या झाली तेव्हा मी दोन दिवस पोलीस ठाण्यात बसून होते पण दिपनला इतके निघृणपणे मारण्यात आले होते की पोलीस मला त्याचा मृतदेह देखील दाखवत नव्हते. दिपनला न्याय मिळवून देण्यात ऐऱोली पोलिसांनी खूप मदत केल्याचे दिपनची बहिण सोमालीने सांगितले.

शर्टावरील टेलरच्या टॅगने लावला हत्येचा छडा लावला
हत्येनंतर एका आरोपीने स्वत:च्या शर्टाने दिपनचे लादीवर सांडलेले रक्त पुसले होते. पळून जाताना ते तो शर्ट सोबत घेऊन जायला विसरले. पोलिसांनी घटनास्थळावरून फक्त हा शर्ट मिळाला होता. त्याव्यतिरिक्त अन्य कुठलाही पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षिदार या प्रकरणात नव्हता. मात्र या शर्टावरील टेलरच्या टॅगवरून पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. या शर्टावरील टॅग हा कराडच्या एका टेलरचा होता. या टेलरची चौकशी केली असता तो शर्ट विनोद बांदल याचा होता. त्यानंतर पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी कराड येथून या तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली.