अंदुरेच्या पिस्तुलानेच दाभोलकर, गौरी लंकेश यांची हत्या, सीबीआयचा कोर्टात खळबळजनक दावा

1

सामना प्रतिनिधी, पुणे

पत्रकार गौरी लंकेश आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली. हे पिस्तूल अंदुरेच्या मेहुण्याच्या मित्राकडून जप्त केले आहे असा खळबळजनक दावा सीबीआयने आज न्यायालयात केला. बॅलिस्टिक रिपोर्टसाठी हे पिस्तूल तपासणीला पाठविले आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली. लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याचेही सीबीआयने सांगितले. त्यामुळे पुढील तपासासाठी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी 30 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

सीबीआयने अंदुरे याच्या पोलीस कोठडीमध्ये डॉ. दाभोलकर यांच्या हत्येबाबत कोणताही तपास केला नाही. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये सारंग आकोलकर, विनय पवार यांच्या हत्या केल्याचे नमूद केले आहे. जनतेचा रोष कमी करण्यासाठी सीबीआयमार्फत ही नवी थेअरी मांडण्यात आली आहे. त्यामुळे अंदुरे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ऍड. प्रशांत साळशिंगीकर यांनी केला.

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती, तर 5 सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सीबीआयने संभाजीनगर येथून सचिन अंदुरे याला 18 ऑगस्ट रोजी अटक केली. 19 ऑगस्ट रोजी अंदुरे याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालामध्ये गुह्यात वापरलेल्या दुचाकीचा शोध सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी ही दुचाकी गुह्यामध्ये वापरल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर दुसरा गोळ्या झाडणारा कळसकर असल्याचे या रिमांडमध्ये नमूद केले आहे. कळसकर हा सध्या ‘एटीएस’च्या कोठडीमध्ये असून त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयला कळसकरचा ताबा हवा आहे. 28 ऑगस्टला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर कळसकर याला या गुह्यामध्ये अटक करण्यात येणार आहे. अंदुरे, कळसकर यांच्याकडे एकाच वेळी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करण्यात येणार आहे. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ज्या आरोपींचा डॉ. दाभोलकर हत्येमध्ये सहभाग आहे त्यांच्याकडेदेखील सीबीआयमार्फत तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे या गुह्याच्या सखोल तपासासाठी अंदुरे याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करावी अशी मागणी अॅड. ढाकणे यांनी केली.

दोन्ही गुह्यांत एकाच आरोपीकडून रेकी
लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे, अमित दिगवेकर यांच्यासह एकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे. लककरच तिघांना दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गौरी लंकेश हत्या आणि नरेंद्र दाभोलकर हत्या कनेक्शन उघड होण्यास मदत होणार आहे.

अंदुरेला भेटण्यास वकिलांना परवानगी
न्यायालयाचा आदेश असतानाही अंदुरे याला वकील, नातेवाईकांना भेटू दिले नाही असा दावा ऍड. साळशिंगीकर यांनी केला. हा न्यायालयाच्या आदेशाचा अपमान असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान न्यायालयाने वकिलांना अंदुरेला भेटण्यास परवानगी दिली.

पिस्तुलाचा प्रवास
बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे अंदुरे याच्याकडे दिली होती. अंदुरे याने हे पिस्तूल त्याचा मेहुणा शुभम् सुरळे याच्याकडे दिले. सुरळे याने हे पिस्तूल त्याचा चुलत भाऊ अजिंक्य सुरळे याच्याकडे दिले. त्यानंतर अजिंक्यने ते पिस्तूल शुभम्च्या सांगण्यावरून त्याचा मित्र रोहित रेगे याच्याकडे दिले.

सीबीआयने संभाजीनगर येथे केलेल्या कारवाईमध्ये हे पिस्तूल रेगे याच्या घरातून जप्त केले आहेत. दरम्यान दाभोलकर यांच्या खुनामध्येदेखील 7.65 एमएम या पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून बॅलेस्टिक अहवालानंतर डॉ. दाभोलकर आणि गौरी लंकेश यांची हत्या त्याच पिस्तुलातून झाली का हे स्पष्ट होणार आहे.

अंदुरे याच्या कोठडीत वाढ
दुपारी एकच्या सुमारास अंदुरे याला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. रविवारी रक्षाबंधन असल्यामुळे अंदुरेच्या मेहुणीने न्यायालयाची परवानगी घेऊन न्यायालयाच्या हॉलमध्येच त्याला राखी बांधली. त्यावेळी कुटुंबीयांनी पाठवलेला ड्रेसदेखील सीबीआयच्या तपासणीनंतर अंदुरे याला देण्यात आला.

summary- dabholkar and lankesh got murdered with same gun says CBI in court