दरोड्याच्या तयारीतील तीन जणांची टोळी जेरबंद

1
आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली.

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड खर्डा रोडवर एका हॉटेल समोर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला जामखेड पोलिसांनी पकडले तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या तीन जणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीच्या मोटारसायकली, गज व मिरचीची पुड आढळून आली.

मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता जामखेड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल बापू गव्हाणे, राहुल सपट, अल्ताफ शेख, राहुल हींगसे, पानसरे, अजिनाथ बडे यांचे पथक करमाळा रोडवर पेट्रोलींग करत होते. या नंतर हे पथक चौफुला येथील करमाळा चौकात आले असता खर्डा रोडकडे भरधाव वेगात काही तरुण मोटारसायकलवरून जातांना दिसले. यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्या मोटारसायकल चा पाठलाग केला या वेळी सदर मोटारसायकल स्वरांना खर्डा रोडवरील एका हॉटेल समोर गाडी अडवून अडवले व त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असता यातील दोन जण जवळील शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. तर आरोपी दिपक बाळू कांबळे वय १९ वर्षे, विजय अशोक माने वय १९ वर्षे दोघे रा. मिलिंदनगर. जामखेड, व दिपक दिलीप साळुंखे वय ३९ रा झोपडपट्टी सोलापूर (हल्ली रा.बीड कॉर्नर, जामखेड) अशा एकुण तीन आरोपींना पकडण्यात यश आले. यावेळी पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन गज मिर्चीची पुड व २० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तीन मोटारसायकली आढळुन आल्या आहेत. या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बापु गव्हाणे हे करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे तीन चोरीच्या मोटारसायकली आढळुन आल्या आहेत. तसेच दोन मोटारसायकलचे पार्ट विकून सांगाडे विहीरीत टाकुन दिले होते. आरोपींना काल जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.