चड्डीतला सुपरस्टार

dada-kondke-image

shreerang-khare>> श्रीरंग खरे

दादा कोंडके हे नाव विस्मरणात गेलंय. दादा माझ्या आवडीच्या मराठीतील कलाकारांपैकी एकुलते एक आहेत. कारण त्यांची सर कोणालाही येणार नाही. ८ ऑगस्ट त्यांची जयंती मात्र आज ते कोणाला आठवतही नाही. कालपरवा, फारसे ओळखीचे नसलेले कलाकार गेले की हल्ली त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना आठवणीतले अमूक, आठवणीतले तमूक असे पिक्चर, स्पेशल शो, एफएमवर श्रद्धांजली असले प्रकार सुरू होता. दादांची जयंतीही कोण साजरी करत नाही आणि पुण्यतिथीही नाही. आजही दादांचे चित्रपट शोधण्यात माझ्यासारखे प्रेमी दिवसदिवस घालवतात, युट्यूबवर त्यांचे चित्रपट आहेत मात्र ते इतक्या वाईट क्वालिटीचे आहेत की ते बघताही येत नाही. थिएटरमध्ये दादांच्या चित्रपटांचा फेस्टीव्हलही लागत नाही. त्यांच्या चित्रपटांच्या हक्कांवरून सुरू असलेल्या लढाईमुळे माझ्यासारखे असंख्यप्रेमी वंचित राहतोय.

आज दादांची जयंती आहे हे अनेकांना माहितीही नाही. ज्यांना माहिती नाही अशांसाठी दादांची अगदी थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न.

खंडेराव कोंडकेंच्या घरी ८ ऑगस्टला जन्माला आलेल्या दादा कोंडकेंची प्रसिद्धी जन्मापासूनच तुफान होती. जन्माला आल्यानंतर राहणार का जाणार अशा अवस्थेत दादा होते. त्यांच्या वडिलांना एके दिवशी घरी लवकर बोलावलं तर लोकांना वाटलं की मुलगा गेला असावा. म्हणून जवळपास २००-३०० माणसं वाडिया हॉस्पिटलबाहेर जमा झाली होती. तेव्हापासून दादांची गर्दीशी झालेली ओळख यमाने खेचून स्वत:कडे बोलावेपर्यंत कायम राहिली, ती कधीही एक टक्क्यानेही कमी झाली नाही. फार पूर्वीपासून लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं हे दादांना खरंतर तरुण वयात येत असतानाच कळायला हवं होतं. कारण ज्या इराण्याच्या घरी सुंदर बायका होत्या आणि जो इराणी घरात कोणालाही येऊ द्यायचा नाही त्या घरात दादांना मनमोकळा प्रवेश होता.

राजाराम गोलटकर नावाच्या मित्रामुळे दादांनी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने पाय ठेवला. व्ही शांताराम यांचा पिक्चर बकवास आहे असं तोंडावर सांगितल्याने याच राजाने दादांच्या कानाखाली मारली होती. श्रीकृष्ण मंडळाजवळ दादांची सेवादलाशी ओळख झाली. तिथेच त्यांना निळू फुले आणि राम नगरकरांसारखे मित्र भेटले. तिघं एकत्र वाढत होते आणि सेवा दलात त्यांचं नाव देखील होत होतं. तिघांनी ‘कोणाला कोणाचा मेळ नाही’, या सेवा दलाच्या लोकनाट्यात काम करायला सुरुवात केली. निळू फुलेंचा रोल अचानक दादा कोंडकेंना करायला सांगितल्यानंतर त्यांची हातभर फाटली होती. त्या नादात त्यांनी स्टेजवरच लोटांगण घातलं.

या तिघांनी मिळून ग.दि.माडगूळकरांनी लिहलेल्या नाटकातील अनेक वाक्य स्वत:च्या पद्धतीने आणि सुचेल त्या नव्या गोष्टींसकट सादर करायला सुरुवात केली, याला हल्ली इम्र्पोव्हायझेशन म्हणून गोंडस नाव दिलं गेलंय. गदिमांवर दादा कोंडकेंना ‘मी लिहलेलं एक तरी वाक्य घ्या की’, असं सांगायची वेळ आली होती.

१९६५ साली दादांनी १ हजारांचं कर्ज काढून ‘विच्छा माझी पुरी करा’ आणायचं ठरवलं. २१ डिसेंबरला पहिला शो लागला जो हाऊसफुल्ल झाला, दादांना गर्दी खेचायचं तंत्र हे ठाऊक होतं, का देवानं लाडका कलाकार म्हणून त्यांना देऊन टाकलेलं कोणास ठाऊक पण, गर्दीचं आणि दादांचं कनेक्शन एकदम फिक्स झालं होतं. वगामधल्या दादांच्या कॉमेंटस जाम भारी असायच्या. एकदा त्यांनी प्रयोगात यशवंतराव चव्हाणांवर कॉमेंट करायचं ठरवलं. प्रयोगापूर्वी काही माणसं आली आणि त्यांनी यशवंतरावांवर कॉमेंट केली तर बंदुकीने गोळ्या घालू अशी धमकी दिली, थोड्यावेळाने आणखी काही माणसं आली आणि कॉमेंट करायचीच अशी धमकी देऊन गेली. शेवटी दादांनी मनाप्रमाणेच केलं आणि कॉमेंट केल्याच, लोकांचा तुफान प्रतिसाद बघून बंदुकीच्या जोरावर धमकी देणारी तिथून निघून गेली.

भालजी पेंढारकर हे दादांना वडिलांप्रमाणे होते, त्यांच्याच ‘तांबडी माती’ या चित्रपटात भालजींनी शिकवलेले धडे दादांनी आयुष्यभर लक्षात ठेवले, आणि त्यानुसार ते वागलेही. दादा फार कमी लोकांचं मनापासून ऐकायचे, त्यात पहिला नंबर भालजींचा होता. ‘सोंगाड्या’मध्ये दादा कोंडकेंनी घातलेली नाडी लोंबणारी हाफ पँट हे भालजींचं इनोव्हेशन होतं, ती पँड दादांनी आयुष्यभर जपली, प्रत्येक चित्रपटाच्या मुहुर्ताच्या शॉटला दादा हीच पँट घालायचे, अगदी ठिगळं लागली तरी.

वैयक्तिक आयुष्याबद्दल दादांनी फार चर्चा केली नाही. मात्र त्यांचं नलिनी या सामान्य घरातील तरुणीबरोबर लग्न झालं होतं, मात्र ते काही कारणांमुळे मोडलं. त्यानंतर दादांनी अधिकृतपणे कोणाशी लग्न केलं नाही. नीला कडवाडकर नावाची अभिनेत्री बायकोप्रमाणेच त्यांच्या घरी रहायची, मात्र नंतर ती त्यांच्या डोक्याचा ताप बनली. आशा भोसले यांनी दादांना लग्नाची मागणी घातली होती मात्र भालजींच्या सल्ल्यावरून त्यांनी या लग्नाला नकार दिला. ऊषा चव्हाण ही दादांच्या आयुष्यातील नाजूक बाब बनून राहिली होती.

दादांना वसंत सबनीसांसारखी प्रेमळ माणसं मिळाली, मात्र काहीतरी बिनसलं आणि ती दूर होत गेली. दादांबरोबर सबनीसांची १०० रुपयांवरून नाराजी झाली आणि ती शेवटपर्यंत राहिली. ‘पांडू हवालदार’च्यावेळीस दादांचा जिगरी मित्र असलेल्या निळू फुळे यांच्याबरोबरही फाटलं. निळू फुले यांनी या चित्रपटात दादांनी विनंती करूनही काम करायला नकार दिला. तो का दिला हे दादांनाही कळालं नाही.

dada-kondke-balasaheb

युती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला दादांनाही बोलावलं होतं. बाळासाहेबांनी दादांना मंत्रीपदाची ऑफर दिली होती मात्र दादांनी ती नम्रपणे नाकारली आणि त्यांना म्हणाले की, तुम्ही शिवसेनाप्रमुख राहणार असाल तर मी देखील शिवसैनिक राहीन. बाळासाहेबांबरोबरचे दादांचे संबंध हे मित्रत्वाच्या पलिकडे जाऊन भावांमध्ये असलेल्या प्रेमाचे होते. शिवसेनेच्या मंचावरवरून दादांनी केलेली भाषणं ही हल्ली युट्यूबमुळे ऐकायला मिळतायत, त्यांच्या भाषणांवर कोणत्याही सेन्सॉरचं बंधन नसल्याने ती तिखट, अश्लील, बोचरी जहाल असायची. शरद पवार, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले, दत्ता सामंत ही दादांची भाषणातील हमखास टारगेट होती. दादांच्या भाषणांमुळे बाळासाहेबांच्या आदेशानुसार शिवसैनिकांच्या कड्यामध्ये दादांना घरी सोडण्यात येत होतं. कारण त्यांच्यावर कोणीतरी हल्ला करेल अशी भीती सतत बाळासाहेबांना वाटायची.

दादांचे हाजी मस्तानसारखेही मित्र होते, ज्यांच्यामुळे त्यांच्या डोक्याला एकदा तापही झाला होता. एका मुलाने तस्करी केलेली सोन्याची बिस्कीटं दादांना विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला हाजी मस्तानने उडवला, त्यानंतर तो विषय दोघांनी बंद केला.

दादांचा पुतण्या विजय कोंडके हा त्यांच्यासाठी अवघड जागेचं दुखणं होतं. विजय कोंडके याला चित्रपटसृष्टीत आणून त्याला मोठा बनवण्याचा विचार करणाऱ्या दादांना नंतर त्याचा पश्चाताप झाला होता. आयुष्याच्या शेवटाला दादांना आपल्यासोबत कोणीही नाही ही खंत सतावत राहिली. ‘एकटा जीव’ या अनिता पाध्येंनी लिहलेल्या चरित्रात लिहलंय की, दादा म्हणतात ‘पुढल्या वर्षी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल ,पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावी हीच माझी इच्छा आहे’. (संदर्भ-एकटा जीव)

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. shreerang.khare@gmail.com