लेख : रेल्वेचा ढिसाळ कारभार

>>दादासाहेब येंधे<<

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या विविध समस्या आणि अपुऱ्या संख्येमुळे अक्षरशः जनावराप्रमाणे लोकांना प्रवास करावा लागतो. किडय़ा- मुंग्यांसारखी माणसे मरतात, पण रेल्वे खात्याला मात्र या चाकरमान्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावीशी वाटत नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ ही म्हण मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना आजकाल वापरली जाते. रुळाला तडा जाऊन किंवा ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत होणे ही तर आता नित्याची बाब झाली आहे. अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू हीसुद्धा रोजची बातमी झाली आहे. वेळेत गाडी न येणे, तिकीट व पास काढण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहणे या गोष्टींची सवय प्रवाशांच्या अंगवळणी पडली आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या सावळागोंधळामुळे ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटाग्राफ तुटणे, गाडी रुळावरून घसरणे, रुळाला तडा जाणे असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. प्रामाणिकपणे तिकीट अथवा पास काढून प्रवास करणारे प्रवासी मध्य रेल्वेच्या सावळागोंधळाचा फटका कधीपर्यंत सहन करणार हे न सुटणारे कोडे आहे. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉकच्या नावाखाली दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. अगदी सहा ते सात तास काम चालते, मात्र आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारीच प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराला सामोरे जावे लागते, हे प्रवाशांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. मेगाब्लॉक या शब्दाचा अर्थ कळला की मनात हसू उमटते. रविवार म्हटला की, कामाला जायची गडबड नसली तरीही काही बेत आखता येत नाही. मेगाब्लॉकच्या नावाखाली प्रवाशांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. ओव्हरहेड, पेंटाग्राफ किंवा रेल्वे रुळावरून गाडी घसरणे आदी प्रकारांतून प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. मेगाब्लॉकच्या नावाखाली एका दिवसाच्या नाटकाला जरा पुढे रेटा आणि कामे करा. इतर सहा दिवसांतही मेगाब्लॉकच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. वेळ मिळाल्यास तातडीने जमेल तेवढय़ा दुरुस्तीचे काम तसेच इतर कामे करून घ्यावीत. रेल्वेचा कारभार सुरळीत चालावा म्हणून रेल्वे प्रशासनाने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. रेल्वेचा विशेषतः मध्य रेल्वेच्या कारभाराची नेहमीच बोंब आहे. मेगाब्लॉकच्या नावाने दर आठवडय़ाला प्रवाशांना अक्षरशः वेठीस धरले जाते, पण गेली काही वर्षे या मेगाब्लॉकमुळे रेल्वेसेवा कितपत सुधारली ते प्रवाशांना मरेच्या सेवेतून जाणवत नसल्याने संबंधित रेल्वे अधिकारीच अधिक सांगू शकतील. वारंवार ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटोग्राफ तुटणे, रेल्वे डबे रूळावरून घसरणे यात काहीही सुधारणा झालेली नाही. ऐन गर्दीच्या वेळी वेळेवर व पुरशा प्रमाणात गाडय़ा सुटत नसल्याने जीव मुठीत घेऊन लटकत प्रवास करावा लागतो, घुसमटत प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचे वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीच सोयरसुतक नाही. मुंबई उपनगरी लोकलच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून फक्त दिल्लीची आर्थिक बाजू भरभक्कम करायची एवढेच! सुरक्षेबाबत नेहमीत प्रवाशांची ओरड वर्षानुवर्षे आहेच, पण कितीशा आणि काय सुधारणा झाल्या? या प्रवाशांचे कुणाला काहीही पडलेले नाही हेच चित्र अजूनही आहे. रेल्वेच्या या ढासळलेल्या कारभाराबाबत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय रेल्वे कारभार रुळावर येईल असे वाटत नाही. रेल्वे प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सोयी- सुविधांचा एकदा सविस्तर अभ्यास करून त्याची पूर्तता करावी.