माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचे अपघाती निधन

सामना प्रतिनिधी । वाणगाव

शिवसेनेचे डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचे आज डहाणू स्थानकानजीक रेल्वे अपघातात निधन झाले. त्यांचे वय 57 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी सकाळी सरावली तलावपाडा येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे.

रात्री 8.20च्या सुमारास मुंबई येथून डहाणूकडे येणाऱया भरधाव लोकलखाली त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईश्वर धोडी यांनी 2002 ते 2005 या कालावधीत डहाणू नगर परिषदेत थेट जनतेच्या मतदानातून 2300 मतांनी विजय मिळवून राष्ट्रवादी काँगेसचे सुरेश गडग यांचा पराभव करत पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला होता. तीन वेळा शिवसेनेकडून डहाणू विधानसभा निवडणूक लढवली होती तर तीन वेळा डहाणू नगर परिषदेच्या सरावली प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगराध्यक्ष पद भूषवताना त्यांनी डहाणू शहरात अनेक विकासकामे केली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हजारो नागरिकांसह पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख केतन काका पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, तालुकाप्रमुख संजय कांबळे, तुषार पाटील, शहरप्रमुख संजय पाटील आणि पदाधिकाऱयांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली.