संस्कृतीच्या दहीहंडीत 50 लाखांच्या बक्षिसांचे ’लोणी’


सामना प्रतिनिधी । ठाणे

मुंबई – ठाण्यातील दहा नामांकित गोविंदा पथकं…शिस्तबद्ध थरांची उभारणी…कडक सलामी या निकषावर ‘प्रो गोविंदा’ या दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेचे विजेते गोविंदा पथक परीक्षक निवडणार आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठान व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आयोजित या दहीकाला उत्सवात 50 लाखांहून अधिक किमतीची बक्षिसं गोविंदा पथकांना दिली जाणार असून गो…गो…गो…गोविंदा गाण्याच्या ठेक्यावर प्रो…प्रो…प्रो… गोविंदाचा गजर ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

दहींहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराने गोविंदा पथकांच्या थरांचे नवनवे विक्रम दरवर्षी अनुभवले आहेत. या विक्रमांचा कित्ता यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात गिरवला जाणार असून देशातील पहिलीच ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा वर्तकनगर येथील पालिका शाळेच्या पटांगणावर दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 3 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. यातील पहिल्या चार पथकांना अनुक्रमे पाच, तीन, दोन व एक लाखाचे रोख बक्षीस, आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. न्यायालयाच्या अधीन राहून हा उत्सव साजरा होणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यावेळी युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक उपस्थित होते.

दहीहंडीतून अवयवदानाचा संदेश
दिव्यांग विद्यार्थी उद्या 28 ऑगस्ट रोजी दहीहंडीद्वारे अवयवदानाचा अनोखा संदेश देणार आहेत. बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ व पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सवात 16 दिव्यांग शाळा जांभळीनाका येथील शिवाजी मैदानावर सहभागी होणार बालगोपाळ मित्र मंडळाचे अध्यक्ष ढमाले यांनी सांगितले.

गोविंदांचे कौशल्य पणाला
मुंबई -ठाणे येथील गोविंदा समन्वय समितीतील सदस्य विजेत्या ‘प्रो गोविंदा’ पथकाची निवड करणार असून या यशस्वी स्पर्धेनंतर पुढील वर्षी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’ होणार आहे. – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, आयोजक