सामना प्रतिनिधी । मुंबई

दहिसरवरून थेट मीरा- भाईंदरपर्यंतच्या प्रवासासाठी उभारण्यात येणाऱया मुंबई मेट्रो टप्पा- 9 तसेच अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत धावणाऱया मेट्रो रेल्वेची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यास आली. सुमारे 6 हजार 607 कोटी रुपये खर्च करून हे दोन मेट्रो रेल्वेचे प्रकल्प उभारण्यात येतील. या दोन्ही रेल्वेमुळे प्रवाशांची 30 ते 40 मिनिटे वाचतील असा अंदाज आहे.

या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 13.58 कि.मी. आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर हा मेट्रोचा मार्ग 10.41 किलोमीटर लांबीचा आहे. हा पूर्ण एलिवेडेट (उन्नत) मार्ग आहे. तर अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंतचा 2.19 कि.मी.चा प्रवास भुयारी आहे तर उर्वरित मार्ग एलिवेडेट आहे. या दोन्ही मार्गांवर दहा एलिवेडेट तर एक भुयारी रेल्वे स्टेशन असेल.

या प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य शासनाचे कर आणि जमिनीच्या खर्चासाठी राज्य सरकारकडून 1 हजार 631 कोटी 24 लाख रुपये बिनव्याजी कर्ज सहाय्य देण्यात येईल. तसेच या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यात येईल.

तिकिटाचे प्रारंभीचे दर

0 ते 3 कि.मी. – 10 रुपये
3 ते 12 कि.मी. – 20 रु.
12 ते 18 कि. मी. – 30 रु.
18 ते 24 कि. मी. – 40 रु.
24 ते 30 कि. मी. – 50 रु.
30 ते 36 कि. मी.- 60 रु.
36 ते 42 कि. मी. – 70 रु.
42 कि. मी.पेक्षा अधिक अंतरासाठी 80 रु.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा खर्च वाढला

रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचा दर वाढल्याने सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीचा एकीकडे भार पडला आहे, तर दुसरीकडे डॉलरचा दर वाढल्याने राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर खरेदीलाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. डॉलरचे दर वाढल्याने राज्याच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात येणाऱया हेलिकॉप्टर खरेदीचेही दर वाढून राज्याच्या तिजोरीवर सुमारे 18 कोटी 16 लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

राज्य सरकारच्या सेवेत सध्या एकच विमान आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी म्हणजे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यासाठी असलेल्या या विमानातून आठ जणांना प्रवास करता येतो. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या विमानात असताना एक इंजिनीयर व एक केब्रिन क्रू सोबत असतो. त्यामुळे फक्त सहाजणांना या विमानातून प्रवास करता येतो. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी असलेल्या हेलिकॉप्टरला मे 2017 मध्ये निलंग्यात अपघात झाला होता तेव्हापासून हे हेलिकॉप्टर बंदच आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून एस 76 हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 127 कोटी 11 लाख रुपये खर्च करण्यात येणार होते.

पूर्वी डॉलरचा दर 70 रुपये होता. आता डॉलरचे मूल्य 80 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी आता 145 कोटी 27 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या खरेदीसाठी पूर्वी आगाऊ रक्कम म्हणून 25 कोटी 42 लाख रुपये कंपनीला देण्याचा करार झाला होता, पण आता डॉलरचा दर वाढल्याने 29 कोटी रुपये आगाऊ रक्कम मोजावी लागेल. हेलिकॉप्टर प्रत्यक्षात राज्य सरकारच्या ताब्यात मिळेल तेव्हा उर्वरित रक्कम कंपनीला देण्यात येईल.

प्रवासाच्या वेळेत 30 ते 40 मिनिटांची बचत.

मार्च 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

सुरुवातीला 8 लाख 47 हजार प्रवासी.

2031पर्यंत प्रवाशांची संख्या 11 लाख 12 हजार

16 हजार 268 टन कार्बन उत्सर्जन घटेल.