तर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला


सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षावर ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याचा हा प्लान फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला. दलीप ताहिल असे त्या अभिनेत्याचे नाव असून त्याने बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

daleep-tahil

रविवारी रात्री दहाच्या सुमारास दलीप हे खार येथून एका पार्टीवरून घरी जात होते. पार्टीत त्यांनी दारू प्यायली होती असे समजते. दारू प्यायलेली असतानाही दलीप स्वत: त्यांची गाडी चालवत होते. खार सीडी रोडवरील चायना गार्डन हॉटेलजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व त्यांच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या रिक्षातील जेनिता गांधी व गौरव चघ हे दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर दलीप हे तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रस्त्यावर विसर्जन मिरवणुका जात असल्याने दलीप फार दूरवर पळून जाऊ शकले नाही. लोकांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले. त्यावेळी लोकांमध्ये व दलीप यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी दलीप यांना अटक केली.

दलीप यांना आम्ही अटक केली व त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या प्रकरणी दलीप यांच्या विरोधात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी सांगितले.एक प्रतिक्रिया

  1. “बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षावर ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याचा हा प्लान फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला.” In the first sentence only you could have named him.