भाजी चोरल्याने दलित व्यक्तीची अमानुषपणे केली हत्या

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । शाहजहांपुर

उत्तरप्रदेशात भाजी चोरल्याच्या आरोपावरून एका दलित व्यक्तीची अमानुषपणे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लखीमपूर खीरीच्या केशवपूर कला गावात ही घटना घडली. ४८ वर्षीय सुकई लाल पासी शनिवारी सकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातून भाजी चोरत होता. त्याचवेळी शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याची ही चोरी रंगेहात पकडली. त्यानंतर चोरी पकडल्याने त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी बेदम होती की त्यामध्ये सुकई यांचा मृत्यू झाला आहे.

पीडित व्यक्तीचे नातेवाईक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. जेव्हा पीडित व्यक्तीचं कुटुंब आणि ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं तेव्हा अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुकई लाल पासी यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीशिवाय पाच मुली आणि एक मुलगा असं कुटूंब आहे. ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते. मात्र आता सुकई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे.