‘सुलतान’पेक्षा ‘दंगल’ उत्तम


सामना ऑनलाईन। मुंबई

कुस्तीवर आधारीत सिनेमा ‘दंगल’आज प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाच्या आधी या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंग म्हणजेच काही खास लोकांसाठी खेळ ठेवण्यात आले होते. या स्पेशल स्क्रीनिंगनंतर सिनेमा बघितल्यानंतर सिनेसृष्टीतील एका नावाजलेल्या कुटुंबाने प्रतिक्रीया दिली आहे की सुलतानपेक्षा दंगल उत्तम आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सलमान खानच्या सिनेमापेक्षा आमीर खानचा सिनेमा उत्तम आहे असं कोणी म्हटलं असेल. याचं उत्तर आहे स्व:त सलमान खानचं संपूर्ण कुटुंब. त्याचं झालं असं की दंगलचा एक विशेष शो सलमानच्या कुटुंबियांसाठी ठेवण्यात आला होता. हा सिनेमा बघितल्यानंतर सलमानच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे की सुलतानपेक्षा दंगल उत्तम सिनेमा आहे.

सलमान खानचा सुलतान हा देखील कुस्तीवर आधारीत सिनेमा होता. कुस्ती शिकून ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळवलेला कुस्तीपटू वैयक्तिक आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे कुस्तीपासून दूर जातो.गमावलेला सन्मान आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तो पुन्हा व्यावसायिक फायटींग स्पर्धेत उतरतो  आणि तो ती स्पर्धा जिंकतो असं या सिनेमाचं कथानक आहे. दंगल हा कुस्तीवर आधारीत आहे, मात्र तो खऱ्या घटनांपासून प्रेरीत आहे, महावीर फोगाट यांनी त्यांच्या मुलींना कुस्तीत कसं उतरवलं आणि मुलींवर कशी मेहनत घेतली हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलंय.