दापोली उपजिल्हा रुग्णालयाला पाण्याची गळती

 

सामना प्रतिनिधी । मंडणगड

दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत असणाऱया महिला वॉर्ड, पुरुष वॉर्ड, स्पेशल पे वॉर्ड, प्रसुती गृह आणि जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कॅम्प रूमच्या कक्षात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याने रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करताना प्रशासनाची तारांबळ चांगलीच उडत आहे. गेली दोन वर्षे सुरू असलेली गळती बंद करण्यासाठी प्रयत्नशील असणा रुग्णालय प्रशासनाच्या पत्रव्यवहाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली आहे.

दापोली तालुक्यासह मंडणगड, गुहागर, आणि खेड तालुक्यातील काही गावातील सर्वसामान्य रुग्णांचे आधार असलेल्या दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच काल रात्रभर कोसळणाऱया पावसाच्या पाण्याच्या गळतीने त्यात आणखी भर पडली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी २६० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यात अधिक उपचारासाठी साधारणपणे दररोजचे सरासरी १८ रुग्ण दाखल केले जातात पावसाळ्यामुळे सद्यस्थितीत साथीच्या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारपासून रुग्णालयात एकूण १५ रुग्ण ऍडमिट असून प्रसुतीसाठी ६ महिला दाखल असून जनरल ९ रुग्ण दाखल आहेत.

रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी असणाऱया इमारतीवर पत्राशेड उभारण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱया गर्भवती महिलांचा लादीवर पडलेल्या पाण्यामुळे घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गतवर्षी रुग्णालयाच्या स्लॅबच्या गळतीच्या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली होती. या वेळी झालेल्या बैठकीत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना रुग्णालयाच्या छप्परावर पत्राशेड उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही संबंधित विभागाने अद्यापही केलेली नाही.