डॅट उपकरणामुळे संकटातील मच्छीमार नौकांचा घेता येणार शोध

सामना प्रतिनिधी । अलिबाग

खोल समुद्रात भरकटलेल्या बोटींना आता तत्काळ मदत मिळणार आहे. यासाठी डॅट उपकरणाचा उपयोग होणार असून पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील 20 मच्छीमारांना हे यंत्र देण्यात आले आहे. त्यामुळे संकटात सापडणाऱ्या खलाशांच्या नौका सुखरूप धक्क्याला लागणार आहेत.

मच्छीमार जेव्हा खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात तेव्हा वातावरणातील बदलामुळे अनेकदा बोटी भरकटल्या जातात. अशा संकटकाळी मच्छीमारांना संपर्क करणे कठीण जाते. मोबाईल जवळ असले तरी रेंज नसल्याने संपर्क होत नाही. अशा कठीण प्रसंगी मच्छीमारांशी संपर्क व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना डॅट उपकरणाचे वितरण करण्यात आले असून याची सुरुवात अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील टाकादेवी मच्छीमार संस्थेच्या 20 मच्छीमारांना देण्यात आले. त्यामुळे आता भरकटलेल्या बोटींना मदत करणे सोपे होणार आहे. सध्या 300 डॅट उपकरण मत्स्यव्यवसाय विभागाकडे उपलब्ध असून त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाणार असल्याची माहिती टाकादेवी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी दिली. दरम्यान रायगड जिल्ह्यात सध्या 3 हजार 444 यांत्रिक तर 1 हजार 499 बिगर यांत्रिक मासेमारी नौका असून प्रत्येक बोटीवर यंत्र बसवण्यात येणार आहे.

बटण दाबताच कोस्ट गार्ड मदतीला
डॅट उपकरण हाताळण्यास सोपे असून कोणत्या प्रकारचा अपघात आहे, यासंदर्भातील ठराविक बटन दाबल्यास त्याची माहिती कोस्टगार्डच्या नियंत्रण कक्षाला मच्छीमारी बोटीच्या जीपीआरएस ठिकाणासह तत्काळ मिळते. ही माहिती मिळाल्यास त्या बोटीचे शोध कोस्टगार्डच्या नौका, हॅलिकॉप्टरद्वारे घेणे सहज शक्य जात असल्याचे रायगड जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अभयसिंह शिंदे-इनामदार यांनी मांडवा येथे मच्छीमारांना मार्गदर्शन करताना सांगितले.