‘संधी साधू’ वासू… स्वत:ला देव म्हणत तरुणीवर केला बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘मीच तुझा देव आहे, कशाला इकडे तिकडे भटकतेस. मी तूझ्यातील सर्व वासना संपवून टाकेन’ असे सांगत दाती महाराज व नंतर त्याच्या समर्थकांनी आपल्यावर बलात्कार केला होता, अशी माहिती पीडित तरुणीने न्यायालयात दिली आहे. यामुळे संकटकाळात शनि देवाची उपासना करण्याचा तोडगा सांगणाऱ्या दाती महाराजाचा वासनांध चेहरा समोर आला आहे.

तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाती महाराजाविरोधात न्यायालयात खटला दाखल झाला आहे. यावेळी पीडित तरुणीने आपली बाजू मांडतांना महाराजांचे अनेक धक्कादायक प्रताप न्यायालयाला सांगितले आहेत. तसेच दाती महाराजाच्या विरोधात मी तक्रार केली आहे. यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मी उद्या जिवंत असेन की नसेन माहित नाही. पण माझ्याप्रमाणे दुसऱ्या मुलींच्या आयुष्याचे वाटोळे होऊ म्हणून मी आवाज उठवला आहे, असेही या तरुणीने न्यायालयात म्हटले आहे.

या घटनेनंतर बरेच दिवस मी घाबरलेले होते. पण शेवटी मला सगळे असह्य झाले आणि मी दाती महाराजाविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला, असेही तरुणीने न्यायालयाला सांगितले. ९ फेब्रुवारी २०१६ साली दाती यांच्या एका महिलेने असोला येथील शनि धाम आश्रमात पीडित तरुणीला नेले होते. त्यानंतर तिला सफेद रंगाचे कपडे परिधान करून गुहेसमान अंधाऱ्या खोलीत पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर दाती महाराजने आपल्यावर बलात्कार केला, असे या तरुणीने न्यायालयाला सांगितले आहे.

दरम्यान, तरुणीने बलात्काराचा आरोप केल्यापासून दाती महाराज फरार आहेत. हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे ते सोपवण्यात आले आहे. सुरुवातीला दाती महाराजाविरोधात तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. त्यानंतर फतेहपूर बेरी ठाण्यात महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.