लेख : हिंदुस्थानी बाजारपेठ विदेशींच्या घशात

>>दत्तात्रय उदास<<

datt.udas63@gmail.com

जेव्हा आपल्या सरकारने मेक इन इंडियाचा जोर लावला तेव्हा असे वाटले की, विदेशी गुंतवणूकदार येथे येतील. गुंतवणूक करून कारखाने उभारतील व त्यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच येथील लघु उद्योजकांना येथे व्यवसायाची मोठी संधी उभी राहील. पण तसे झाले नाही. विदेशी कंपन्यांनी ही संधी येथील बाजारपेठ काबीज करण्यासाठी साधली.

 विदेशी कंपन्यांच्या दृष्टीने ‘हिंदुस्थान’ ही एक मोठी बाजारपेठ समजली जाते. इथे असलेली अफाट लोकसंख्या व त्यांची वाढती क्रयशक्ती यामुळे मालाचा खप प्रचंड आहे. त्यात भरीस भर म्हणून सरकारतर्फे पण पायाभूत क्षेत्रात बरीच गुंतवणूक केली जाते.

हिंदुस्थानचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे इथे लागणाऱ्या वस्तू इथेच बनविल्या जातात. आपल्याकडे तांत्रिक ज्ञान असलेले बरेच जण आहेत. उद्योगव्यवसाय करण्याकडे लोकांचा कल आहे. अगदी मोठय़ा टर्बाईनपासून ते नटबोल्डपर्यंत सर्व काही इथे बनते. येथील कंपन्या या इथल्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. भरीव गुंतवणूक करून कारखाने सुरू केले आहेत. पण आज हे कारखाने त्यांच्या पूर्ण क्षमतेवर उत्पादन करीत नाहीत. त्यांना पूर्ण बाजारपेठ मिळत नाही. इथली बरीच बाजारपेठ परदेशी कंपन्यांच्या मालाने भरलेली आहे. त्यांना इथे व्यवसाय करता यावा म्हणून पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

सोबत जोडलेला तक्ता हे दर्शवितो की, जो माल हिंदुस्थानात बनतो तो आयात पण केला जातो. ऊर्जा क्षेत्रातील ही उपकरणे बाहेरून आणण्याची गरज काय? आपली उत्पादन क्षमता पूर्ण वापरायची नाही आणि बाहेरील इतर देशांतील लोकांना भरपूर रोजगार उपलब्ध करून द्यायचा ही पद्धत कुठली?

आज पायाभूत क्षेत्रे  म्हणजे ऊर्जा, जलसंवर्धन, रोड, ब्रिजेस, रेल्वे वगैरे करता सरकार अब्जावधी रुपये खर्च करीत आहे. हे सर्व हिंदुस्थानीं कंपन्या पुरवू शकतात. या खर्चातील बराचसा भाग या परदेशी कंपन्या घेऊन जातात.

पॉवरग्रीड या मध्यवर्ती संस्थेने बराच माल परदेशातून विकत घेतला. जेव्हा यावर सर्वत्र टीका झाली तेव्हा त्यांनी टेंडरमध्ये अट घातली की, किमान २५ टक्के उत्पादन हे हिंदुस्थानात व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही.

बुलेट ट्रेन या महागडय़ा प्रकल्पात सर्व गोष्टी जपानमधून येत आहेत. अगदी रुळाखालील दगडसुद्धा जपानी आहे. जेव्हा आपल्या सरकारने ‘मेक इन इंडिया’चा जोर लावला तेव्हा असे वाटले की, विदेशी गुंतवणूकदार येथे येतील. गुंतवणूक करून कारखाने उभारतील व त्यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच येथील लघु उद्योजकांना येथे व्यवसायाची मोठी संधी उभी राहील. पण तसे झाले नाही. विदेशी कंपन्यांनी ही संधी येथील बाजारपेठ काबीज करण्यासाठी साधली.

हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे की, जिथे सर्व वस्तूंचे उत्पादन होते आणि सर्व काही विकले जाते. आपल्याला दुसऱ्या देशांवर विसंबून राहण्याची गरज नाही. जर येथील उद्योजकांना योग्य संधी मिळाली तर ते तरुणांना रोजगार मिळवून देऊ शकतील.

तक्ता क्रमांक

विजेच्या उपकरणांची आयात व निर्यात

क्र.  उपकरणाचे नाव   बाजारपेठ मूल्य आयात

                            (रु.कोटी)        (रु.कोटी)

१    मोटर व जनरेटर        ६९००              १७५०

२    पॉवर ट्रान्स्फॉर्मर        ५८६०              ३०८

३    वितरण ट्रान्स्फॉर्मर      ६४७८              २७८

४    कॅपेसिटर                 ५३२              १०७

५    एचव्ही स्विचगिअर      ४९६१              १३९३

६    एलटी स्विचगिअर       १४५६४            ८११९

७    केबल                     ४१२५०          ७०५

८    इन्सुलेटर                 १९९२             ७१०

९    एनर्जी मीटर              २५८०              १५

१०  कंडक्टर                  ७२५०             ४३१