संशयास्पद पत्र उघडल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची सून रुग्णालयात

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प (ज्युनिअर) याच्या बायकोला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरी आलेला एक संशयास्पद लिफाफा उघडल्यानंतर तिला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या लिफाफ्यातील पत्रावर पांढऱ्या रंगाची पावडर लावण्यात आली होती. ही पावडर जीवघेणी तर नाही ना असा संशय आल्यानं ही खबरदारी घेण्यात आली आहे.

व्हेनेसा ट्रम्प यांच्यासह अन्य दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सगळ्यांना रुग्णालयात भरती केल्याचं सांगण्यात आलं आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी पत्रातील पावडरची तपासणी केली, या तपासणी ही पावडर घातक नसल्याचं कळालं आहे. या पावडरमुळे व्हेनेसा यांना कोणताही त्रास झाला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. हा लिफाफा व्हेनेसा यांच्या आईने घेतला होता मात्र तो व्हेनेसा यांनी उघडला होता. पूर्वी मॉडेलिंगचं काम करणाऱ्या व्हेनेसा ट्रम्प यांनी २००५ साली डोनाल्ड ट्रम्प (ज्युनिअर)बरोबर लग्न केलं असून, या दांपत्याला एकूण ५ मुलं आहेत.