भय्यूजी महाराज अनंतात विलीन 

सामना ऑनलाईन । इंदूर

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमधील मेघदूत मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यूजींची मुलगी कुहू हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांच्या अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भय्यूजींच्या पश्चात पत्नी आयुषी, मुलगी कुहू आणि आई कुमुदिनी असा परिवार आहे

भय्यूजी महाराज यांनी तणावातून मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक स्तरातील लोकांना तसेच त्यांच्या अनुयायांना जबरदस्त धक्का बसला.

बुधवारी सकाळी भय्यूजी महाराजांचे पार्थिव त्यांच्या इंदूरमधील सर्वोदय आश्रमात सकाळी दहा ते दीड वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराजांच्या हजारो अनुयायांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.