विश्वासू साथीदार जुबेर मोतीला दाऊदनेच अडकवला ?

सामना ऑनलाईन, मुंबई

दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार मानला जाणाऱ्या जबीर मोती याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमागे दाऊद उब्राहीमच असल्याचा दावा केला जातोय. दाऊद सध्या प्रचंड आजारी आहे. त्याच्याशी विश्वासघात करण्याची शक्यता असलेल्यांना तो पोलिसांच्या कचाट्यात अडकवून त्यांना धडा शिकवत असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

दाऊदचा व्यवसाय अमेरिका, इंग्लंडसोबत काही अफ्रिकी देशांमध्येही आहे. हा व्यवसाय दाऊदला हळूहळू गुंडाळायचा आहे. उरला सुरला धंदा कुटुंबातीलच कोणीतरी सांभाळावा अशी त्याची इच्छा आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये दाऊदचा भाऊ अनीस इब्राहीमचं वर्चस्व टोळीमध्ये वाढलं आहे. आपला मृत्यू झाला तर आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणून दाऊदने त्याला धोकादायक वाटत असलेल्या सहकाऱ्यांचा काटा काढायचं ठरवल्याचं बोललं जात आहे.

जबीर हा दाऊदचा अमेरिका आणि इंग्लंडमधील कारभार पाहत होता. त्याचे इक्बाल मिर्ची आणि मिर्चीचा लंडनमध्ये राहणारा भाचा आसिफ यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. या आसिफच्याच सांगण्यावरून जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जातंय. जबीरच्या अटकेमुळे दाऊदच्या माहितीसोबतच या अपहरणाचाही उलगडा होण्याची तपास यंत्रणांना आशा आहे.