तावरजा नदीकाठाजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

1

सामना प्रतिनिधी । लातूर

उमरगा तालुक्यातील मौजे कवठा शिवारात लातूर-उमरगा रस्त्याच्या कडेला एका बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करुन मृतदेह फेकून दिला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मयत मुलीची ओळख पटलेली नव्हती.

लातूर – उमरगा रस्त्यावरील उमरगा तालुक्यातील कवठा शिवारात तेरणा नदीकाठाच्या पुलाजवळील दक्षिण बाजूला सकाळी एका अंदाजे तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ ही माहिती पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. किल्लारी, कासारशिरसी आणि उमरगा या तिन्ही ठिकाणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र सदरील घटनाही उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने उमरगा पोलीसांनी पंचनामा सुरु केला आणि किल्लारी व कासारशिरसीचे पोलीस परत गेले. मयत मुलीच्या अंगावर जखमा असून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करुन प्रेत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर नेमका काय प्रकार घडला ते समजून येईल. या प्रकाराने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. मयत मुलीची ओळख पटलेली नाही. उमरगा पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.