…म्हणून मृतदेह १० दिवस ठेवला चर्चमध्ये

फोटो प्रातिनिधीक

सामान ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील नागपाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १० दिवसांपासून एका मृत तरुणाला प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. चर्चमध्ये घडलेली ही अंधश्रद्धेची धक्कादायक व तितकीच गंभीर स्वरुपातील घटना आहे. मुंबईतील नागपाडा येथे राहणा-या १७ वर्षांच्या मशकचा १० दिवसांपूर्वी मुंबईतील एका सरकारी रूग्णालयात कर्करोगाच्या आजाराने मृत्यू झाला. मशक ऑक्टोविवो असे मृत तरुणाचे नाव आहे.

मशकचा मृतदेह नागपाडा येथील इमारतीच्या तळमजल्यावर ठेवून त्याला जीवंत करण्यासाठी चर्चच्या फादरना बोलावून प्रार्थना सुरू होती. मात्र ९ दिवस झाले तरी मशक जीवंत न झाल्याने त्याचा मृतदेह अंबरनाथ येथे हलविण्यात आला.

अंबरनाथ येथील नारायण टॉकीज शेजारी असलेल्या एका चर्च मध्ये मशकचा मृतदेह ठेवण्यात येऊन फादरने त्याला जीवंत करण्यासाठी येशूची प्रार्थना सुरू केली. नातेवाईकही चर्चमध्ये ठाण मांडून बसले होते. त्याला जीवंत करण्यासाठी चर्चचे फादर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्यात प्रयत्न केला परंतु मशकच्या मृत्युला १० दिवस होऊन गेल्याने मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.

अंबरनाथ पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मशकच्या नातेवाईकांना समज दिली. त्यानंतर मशकचा मृतदेह रविवारी रातोरात बाहेर काढला आणि त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत मशकच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं आहे.