केरळमध्ये महापुरानंतर युद्धपातळीवर मदतकार्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अस्मानी संकटात सापडलेल्या केरळमधील जनतेला महापुराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य राबवण्याचे आदेश केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्य करणार्‍या सरकारी संस्थांना दिले आहेत. केरळची पूरस्थिती महाभयंकर असून पुरात सापडलेल्या हजारो केरळी नागरिकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यासाठी लष्कर, नौदल, कोस्टगार्ड, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल (एनडीआरएफ) आणि अन्य पोलीस बलांच्या जादा तुकडय़ा नागरिकांच्या बचावकार्यासाठी केरळमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या पूरस्थितीची दाखल घेत केरळ आणि तामीळनाडू सरकारला उभय राज्यांना जोडणार्‍या नद्यांवरील धरणातील पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. केरळच्या महापुराने आतापर्यंत 114 जणांचा बळी घेतला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीला देशाच्या तिन्ही लष्करी दलांचे प्रमुख, राज्य आणि केंद्राचे गृह, संरक्षण सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केरळातील पूरस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

फूड पॅकेटस्, पिण्याचे पाणी आणि दुधाच्या पावडरचा मुबलक पुरवठा
पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी फूड पॅकेटस्, पिण्याचे पाणी आणि दुधाची पावडर यांचा मुबलक साठा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पुरविण्यात आला आहे. याशिवाय एनडीआरएफच्या जादा 18 तुकडय़ा, इंजिनीअरिंग टास्क फोर्सचे 9 कॉलम, कोस्टगार्डच्या 22 टीम आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या 24 अतिरिक्त टीम केरळात पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय हेलिकॉप्टर्स, विमाने, वैद्यकीय पथके आणि औषधांचा मोठा साठा पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आला आहे.

… तर 1924च्या महाप्रलयाची पुनरावृत्ती
गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधल्या 14 पैकी 12 जिह्यांना या पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. पावसाचे हे रौद्ररूप पाहून केरळमधल्या जनतेला 1924 सालची पुनरावृत्ती होण्याची भीती सतावत आहे. केरळच्या इतिहासात 1924 साली सर्वाधिक पाऊस कोसळला होता. त्या वर्षी सलग तीन आठवडे केरळमध्ये 3,368 मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी पेरीयार नदीला आलेल्या पुरामुळे कारीनथिरी मलाई ही टेकडी वाहून गेली होती. 1924च्या महापुरात एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या मोसमात 1924 सारखा पाऊस कोसळलेला नाहीय. पण 1 जून ते 15 ऑगस्ट या काळात 2,087.67 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू झाला आहे. अजून मान्सूनचे काही आठवडे बाकी आहेत.