संगमेश्वर जवळील मृत्यूची भिंत लवकरच जमिनदोस्त होणार

सामना ऑनलाईन । संगमेश्वर  जे . डी . पराडकर

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळील माभळे गावात असणारी आणि असंख्य अपघातास कारणीभूत ठरुन अनेकांचे प्राण घेणारी ‘ मृत्यूची भिंत ‘ अखेर लवकरच जमिनदोस्त होणार आहे . ही धोकादायक भिंत हटविण्यासाठी यापूर्वी वाहनचालकांनी अनेकदा आंदोलने करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनंही दिली होती . मात्र ही धोकादायक भिंत न हटविल्याने सतत अपघात घडतच होते. अखेर मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना आजवर १४ पेक्षा अधिक बळी घेणारी ही भिंत जमिनदोस्त होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या दुतर्फा आरवली ते बावनदी हा ३६ किमी लांबीचा मार्ग अति अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या दरम्यान अरुंद पूल, अरुंद मोऱ्या, अवघड वळणं , तीव्र चढ आणि उतार अशा कारणांमुळे वेगाने येणाऱ्या तसेच कोकणातील रस्त्यांची कल्पना नसलेल्या वाहनचालकांचे सर्वाधिक अपघात घडत असतात . वाहनचालकांकडून सातत्यपूर्ण मागणी झाल्याने काही ठिकाणी रुंदीकरण करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले . महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि वेग पाहता हे चौपदरीकरण होइपर्यंत अपघात घडत राहणार हे सत्य नाकारता येत नाही .

संगमेश्वर हा अपघात प्रवण पट्टा मुंबई आणि गोवा या दोन्ही शहरांच्या मध्यावर येतो . मुंबईहून रात्री सुटलेली वाहने संगमेश्वरला येण्यास बरोबर पहाट होते आणि पहाटेची वेळ चालकांच्या डोळ्यावर झापड येणारी असल्याने बहुतेक वेळी अनावर होणारी झोप हे याभागातील अपघाताचे मुख्य कारण असते . संगमेश्वर जवळील माभळे येथे अवघड वळणावर असणाऱ्या शंभर फूट लांबीच्या काळ्या दगडाच्या भिंतीमुळे गेल्या दहा वर्षात या एकाच ठिकाणी २७ अपघात झाले . येथील अपघातात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३६ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले . जखमींपैकी ०५ प्रवासी कायमचे जायबंदी झाले आहे . सातत्याने एवढे अपघात घडून येथे मृत्यूचा आकडा वाढत राहिल्याने सर्वप्रथम दैनिक सामनाने वृत्त प्रसिद्ध करुन येथील अवघड वळणावर असणाऱ्या भिंतीचे वर्णन ‘ मृत्यूची भिंत ‘ असे केले होते .

संगमेश्वर येथील पर्शराम पवार या वाहतुकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक सामनाचा हवाला देवून ही धोकादायक भिंत हटविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र वारंवार मागणी करुन  आणि निवेदनं देवून बांधकाम विभागाने ही भिंत न हटवल्याने पर्शराम पवार यांनी स्वतः जेसीबी लावून ही भिंत हटविण्याचा इशारा देताच , अवघड वळणाच्या दोन्ही बाजूस गतिरोधक टाकण्यात आले तसेच एका बाजूला रस्ता मातीचा भाग हटवून काही प्रमाणात रुंद करण्यात आल्याने पवार यांनी आपले आंदोलन स्थगीत केले होते. कालांतराने ही मृत्यूची भिंत काही हटली नाही . अखेर महामार्गाच्या चौपदरीकरणात माभळे येथील ही मृत्युची भिंत जमिनदोस्त करण्याबाबत नुकतेच अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याने १४ पेक्षा अधिक प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी ही भिंत आता लवकरच जमिनदोस्त होणार आहे , यामुळे वाहनचालकांनी तसेच ही धोकादायक भिंत हटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पर्शराम पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे .