मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शेतकऱयाची रेल्वेखाली आत्महत्या

सामना ऑनलाईन,नाशिक

भावाच्या कर्जमाफीची प्रोत्साहन रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, मात्र नोटाबंदीमुळे जिल्हा बँकेत पुरेसे पैसे नसल्याने ही रक्कम एकरकमी नाही तर एक हजार रुपये प्रतिआठवडा मिळेल, असे सांगितल्यानेच व्यथित झालेले भगूर येथील कर्जबाजारी शेतकरी जगदीश बहिरू शिरसाठ (३७) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ‘कर्जमाफी केली, पण हातात पैसे मिळत नाही, माझ्या पश्चात पत्नीला न्याय द्या’, अशी विनवणी या शेतकऱयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या चिठ्ठीत केली आहे. ही आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झालीच नाही, हे सिद्ध करण्यासाठी मंगळवारी दिवसभर सरकारी यंत्रणेचा खटाटोप सुरू होता.

मयत जगदीश शिरसाठ यांचे एकत्रित कुटुंब आहे, भगूरच्या जैन वाडा येथे ते राहतात. भाऊ, वडील आणि पत्नी यांच्या नावावर असलेल्या कर्जाने ते चिंतेत होते. कर्जमाफी योजनेतून १८ हजार ४८२ रुपये मंजूर झालेली प्रोत्साहन रक्कम भाऊ संदीप यांच्या खात्यावर जमा झाली. ही रक्कम मिळावी यासाठी जगदीश यांनी जिल्हा बँकेच्या शाखेत धाव घेतली. नोटाबंदीमुळे बँकेत पैसेच नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून असंख्य खातेदारांची रक्कम हजार-पाचशे रुपयांच्या हप्त्याने दिली जात आहे, याचा प्रत्यय जगदीश यांनाही आला. त्यांनी भावाच्या खात्यातील रक्कम एकाचवेळी मिळावी, अशी मागणी केली. मात्र, प्रतिआठवडा एक हजार रुपये याप्रमाणे हे पैसे मिळतील, असे संबंधित अधिकाऱयांनी त्यांना सांगितले. अठरा आठवडे पूर्ण रकमेसाठी जातील, यामुळे व्यथित झाल्याने सोमवारी जगदीश यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.