।। दिव्या दिव्या दीपत्कार।।


मीना आंबेरकर

दीप अमावास्येच्या निमित्ताने आपण काही खिरींचे प्रकार व  खिरीसाठी वापरण्यात येणारा मसाला..

आषाढातील अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या आषाढ. हा तसा पावसाचा महिना. आभाळ भरून आलेले. आकाशात ढगांची गर्दी. अशा या अंधारलेल्या दिवसात आपल्याला आपल्या बाजूला झळाळता प्रकाश असावा असे वाटते. अंधारून आल्यामुळे मनही उदास असते. अंधारलेल्या वातावरणात पूर्वी प्रकाशाची उजेडाची गरज वाटायची. मग अशावेळी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांच्यात तेल वात करून ते पेटवायचे. त्यांची पूजा करायची.

आपल्या भोवती आणि आपल्या मनात असलेला अंधार नष्ट करून त्याच्याकडे प्रकाशाची मागणी करायची. त्यांना खीर-पुरीचा नैवेद्य दाखवायचा अशी घरोघरी प्रथा होती. आता शहरात जरी तेल वातीचे दिवे नसले तरी दीप अमावास्येला दिव्याची पूजा करण्याची प्रथा काही घरातून अजूनही कायम असलेली दिसून येते. अशा या दीप अमावास्येच्या निमित्ताने आपण काही खिरींचे प्रकार व खिरीसाठी वापरण्यात  येणारा मसाला यासंबंधी जाणून घेणार आहोत.

प्रथम पाहूया खिरीचा मसाला.

साहित्य…५०० ग्रॅम काजू, २५  ग्रॅम बदाम, २५  ग्रॅम पिस्ते, १० ग्रॅम वेलची, २० ग्रॅम केशर, १ जायफळ. या सर्व साहित्याची बारीक पूड करावी व बाटलीत भरून ठेवावी.

khher-12

शेवयांची खीर

साहित्य…शेवया, दूध, साखर, खिरीचा मसाला, साजूक तूप.

कृती…१ वाटी शेवया जरा चुरून मंद गॅसवर कोरडय़ाच परताव्या. नंतर त्यात साजूक तूप घालून जरा परतून ताटात काढाव्यात. एक लिटर दुधाला उकळी आणून त्यात थोडय़ा थोडय़ा शेवया घालत ढवळत राहावे. शेवया शिजल्यावर त्यात १ वाटी साखर, दोन चमचे खिरीचा मसाला घालून एक उकळी आणावी. खीर उतरवून झाकून ठेवावी.

gahu-12

गव्हाची खीर

१ वाटी गहू सडून मऊ शिजवावा. रवीनं घुसळावा. घुसळलेल्या गव्हात दीडपट गूळ घालावा. १ टेबल स्पून भाजून कुटलेली खसखस, दोन वाटय़ा ओलं खोबरं, खिरीचा मसाला घालून एक उकळी काढावी व खीर उतरावी. पान वाढण्याच्या वेळी पातळ खीर हवी असल्यास त्यात त्याप्रमाणे दूध घालावं. कारण त्यात गूळ घातलेला आहे. म्हणून दूध ऐनवेळी घालायचं आहे. गहू व तांदूळ सम प्रमाणात घेऊन वरीलप्रमाणे खीर करावी.

bundi-kheer-final

बुंदीची खीर

साहित्य -१ वाटी बुंदीच्या कळ्या, एक लिटर दूध, साखर, खिरीचा मसाला.

कृती दूध आटवून थोडं दाट करावं. त्यात पाऊण वाटी साखर व बुंदीच्या कळ्या, खिरीचा मसाला घालून खाली उतरवावी.

rice-kheer-finsal

तांदळाची खीर

साहित्य तांदूळ, दूध, साखर, खिरीचा मसाला, बेदाणे.

कृती अर्धी वाटी तांदूळ खीर करण्यापूर्वी एक तास अगोदर धुऊन ठेवावे आणि तांदळाच्या तिप्पट गरम पाणी घालून मंद गॅसवर ठेवून थोडा ढवळून खाली उतरावे. एक लिटर दूध उकळा व त्यात वरील साखर व भात घालावा. खिरीचा मसाला घालून बेदाणे घालून खीर खाली उतरवावी.

पुरणाची खीर

साहित्य चणा डाळ, नारळ, गूळ, खिरीचा मसाला, चारोळ्या

कृती एका नारळाचं जाड व पातळ दूध काढावं. पातळ दुधात आणखी थोडं पाणी घालून एक वाटी चणाडाळ अगदी मऊ शिजवावी. नंतर डाळ रवीनं चांगली घोटावी. त्यात पाऊण वाटी गूळ व आवश्यक तेवढं पाणी घालून खीर सारखी करावी. नंतर त्यात जाड दूध व खिरीचा मसाला घालून एक उकळी काढून खीर उतरवावी. त्यावर चारोळ्या पसराव्यात.