दीपक नागरगोजे

डॉ. नीलम ताटके

समाजात एखादी समस्या समोर दिसली की काहीजण त्यावर चर्चा करतात, काहीजण त्याविषयी हळहळ व्यक्त करतात तर काहीजण त्यावर थेट कृती करतात. अशीच एक व्यक्ती दीपक नागरगोजे. ते शेतकऱयांच्या प्रश्नावर आपल्या भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘शेतकरी मनोबल प्रकल्प’ राबवत आहेत. त्यांची संस्था बीड जिल्हय़ातील आर्वी येथे कार्यरत आहे. त्यांना भेटण्याची संधी मिळाली ती आर्टिस्ट्रीच्या ‘देणे समाजाचे’ या उपक्रमामुळे. नागरगोजे यांनी नेमकं केलं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांनी शेतकरी मनोबल प्रकल्पाद्वारे नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, लघु बंधारे बांधकाम, अकरा मोठय़ा शेत तलावांचे काम पूर्ण केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दहा शेतकऱयांना दत्तक घेऊन त्यांच्या शेतात शेत तलाव निर्माण केले आहेत. प्रगतिशील शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. या प्रकल्पासाठी आर्थिक मदतीची गरज होती ती देणे समाजाच्या माध्यमातून एकरकमी पाच लाख रुपये मिळाल्याने काही प्रमाणात पूर्ण झाली. या प्रकल्पात पुण्यातील उद्योगपती शशिकांत चितळे आणि सुरेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांचा सहभाग यात मोठा आहे. याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱयांची दोनशे मुलं पालनपोषण आणि शिक्षणासाठी दत्तक घेतली. आज ती मुले पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथे घेतात आणि त्यांना पुढील शिक्षण घेण्याकरता पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पाठवले जाते. या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च संस्थाच करते. हा प्रकल्प ‘तारांगण’ या नावाने ओळखला जातो. शेतकरी मनोबल प्रकल्पाच्या उद्दिष्टात गरीब शेतकऱयांना शेततलाव तयार करून देणे, पाण्याची साठवण व योग्य वापर तसेच सेंद्रीय व कमी खर्चाची शेती, सुधारित आणि कायम उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी मार्गदर्शन, सामूहिक गट शेतीसाठी प्रोत्साहन अशा व्यापक बाबींचा समावेश आहे. संस्थेने ‘प्रत्येक मूल एक प्रकल्प’ समजून जोपर्यंत ते त्याच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी उभं राहायचं असं उद्दिष्ट ठरवलं आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, ना नफा ना तोटा या तत्त्वावर खते व बियाणे उपलब्ध करून देणे, कायम उत्पन्न देणाऱया शेतीविषयी मार्गदर्शन यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येच्या विचारापासून नक्कीच परावृत्त झाले असतील. पुण्यात १५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘देणे समाजाचे’ या तीन दिवसीय उपक्रमातही नागरगोजे सहभागी झाले आहेत.