लोकं पोस्टरवरील फोटो पाहून सिनेमागृहात येत नाहीत, दीपिकाचा तिन्ही खानांना टोला

91

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकं आता पोस्टरवर कोणत्या सुपरस्टारचा फोटो लागला आहे हे पाहून सिनेमागृहात येत नाहीत, असा टोला अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिन्ही खानांना लगावला आहे. दोन दशकांपेक्षा जास्त काळ बॉलिवूडवर राज्य करणारे सलमान, शाहरूख आणि आमिरचे चित्रपट गेल्या वर्षात काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत, परंतु नवखे आणि खानांव्यतिरिक्त अभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलेच हिट ठरले. याच अनुषंगाने दीपिका बोलत होती.

2018 मध्ये आनंद एल रायच्या ‘झिरो’ चित्रपटात शाहरूख खान दिसला, तर तौरानी ब्रदर्सच्या ‘रेस-3’ मध्ये सलमान खान दिसला तसेच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’मध्ये आमिर खान दिसला. हे तिन्ही चित्रपट सुपरस्टार्सच्या लौकिकास साजेशी कमाई करू शकले नाहीत. तिन्ही खान तोंडावर आपटल्याची चर्चा बॉलिवूडमध्येही रंगली. ‘गल्ली बॉय’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान रणवीर सिंहला तिन्ही खानांचे चित्रपट फ्लॉप झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने मोठमोठ्याने हसत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात यावा असे उत्तर दिले.

रणवीरच्या या उत्तरानंतर खानांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्याची पत्नी दीपिका पदुकोण हिने केले. एका कार्यक्रमात दीपिकाने गेल्या वर्षातील टॉप 5 बॉलिवूड चित्रपटांचे नाव घेतले. यात तिन्ही खानांच्या एकाही चित्रपटाचा साधा उल्लेखही नव्हता. 2018 मध्ये महिलाप्रधान चित्रपटांनी चांगला गल्ला जमवल्याचे दीपिका म्हणाली. तसेच गेल्या वर्षात तिन्ही खानांचे चित्रपट चालले नाही परंतु आयुष्मान खुरानाचा अंधाधून चित्रपट चांगला गल्ला जमवून गेल्याचेही ती यावेळी म्हणाली.

सध्याची पिढी चित्रपट पुरुषप्रधान आहे की महिलाप्रधान आहे हे पाहात नाहीत. चित्रपटाची कथा आणि आशय पाहून लोकं सिनेमागृहात येतात. तसेच सध्या आणि येणाऱ्या काळात चित्रपट पाहण्यासाठी लोकं पोस्टरवरील बड्या स्टारचा फोटो पाहून येणार नाही, तर आशय पाहून येतील असेही ती यावेळी म्हणाली. बड्या स्टार्सचे फोटो पाहून चित्रपट पाहणाऱ्यांचा काळ आता गेल्याचेही ती मिश्किलपणे म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या