इटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे दोघे बुधवारी लग्नबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये पारंपरिक कोंकणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी मोजक्याच कुटुंबीयांची उपस्थिती होती, तर आज सिंधी पद्धतीने लग्नाचे काही विधी पार पडणार आहेत. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली होती. लग्नसोहळय़ाचे फोटो लीक होऊ नयेत याचीही खबरदारी घेण्यात आली होती. येत्या 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रॅण्ड हयात या आलिशान ठिकाणी दीपवीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलीवूडला आमंत्रण देण्यात आले आहे.