वाढदिवशीच दीपिका करणार रणवीरसोबत साखरपुडा

सामना ऑनलाईन । मुंबई

विराट व अनुष्काच्या राजेशाही लग्नानंतर बॉलिवूडमधील अनेक जोड्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. बॉलिवूडमधील हिट जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंग देखील लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या तरी हे दोघे साखरपुडा करणार आहेत. येत्या पाच जानेवारीला म्हणजेच दीपिकाच्या वाढदिवशीच श्रीलंकेतील कोलंबो येथे हे दोघे साखरपुडा करणार असल्याचे वृत्त मिड डे या वृत्तपत्राने दिले आहे.

नवीन वर्ष सुरू होण्याआधी एका जाहिरातीच्या शुटींगसाठी रणवीर कोलंबोला गेला होता. त्यानंतर दीपिका देखील बॉयफ्रेण्डसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोलंबोला गेली. तेथे त्या दोघांनी जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. सध्या ते कोलंबोतच असून दीपिकाचा वाढदिवस साजरा करूनच ते हिंदुस्थानात परतणार आहेत. पण तेथे दीपिकाच्या वाढदिवशीच ते दोघे साखरपुडा करणार आहेत, असे वृत्त मिड डे ने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीरने दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांची भेट घेतली होती. रणवीरने त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या भेटीत देखील दीपिका व रणवीरच्या लग्नाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दीपिका आणि रणवीरने कधीच औपचारिकरित्या त्यांच्या नात्याबाबत सांगितलेले नाही पण ते दोघे कायम एकमेकांसोबत पार्ट्या करतात, फिरायला जातात.