तुमची जहाजे उडवू; इराणची अमेरिकेला धमकी


सामना ऑनलाईन । तेहरान

अमेरिका आणि इराणचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. अमेरिकेचे निर्बंध आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला धमकी देत निर्बंध मागे घेण्याची मागणी केली आहे. आखाती देशातील तुमची जहाजे आम्ही सहज उडवू शकतो. आमच्या शक्तीला कमी लेखू नका, याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे. इराण-अमेरिकेच्या वाढत्या तणावामुळे युद्धाची भीती वर्तवण्यात येत आहे. अमेरिका युद्धाच्या दिशेने वाटचाल करत नसून इराणशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. मात्र, इराणची चर्चेची तयारी नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तर अमेरिकेने निर्बंध मागे घ्यावे अशी इराणची मागणी आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात इराणशी करण्यात आलेला अणूकरार डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 2015 मध्ये रद्द केला. त्यानंतर इराणवर कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले. इराणकडून तेल आयात करणाऱ्या देशांनाही आयात रोखण्याच्या सूचना अमेरिकेने केल्या. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला आहे. त्यातच अमेरिका इराणवरील दबाव आणखी वाढवत असल्याने इराणची कोंडी झाली आहे. त्यामुळे आखाती देशातील तुमची जहाजे आम्ही सहज उडवू शकतो अशी धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे. आमच्या कमी अंतरावरील क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखाती देशातील अमेरिकेची जहाजे आणि लडाऊ जहाजे आहेत, ती उडवण्याची क्षमता आमच्यात आहे, असे इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे सहकंमाडर सलेह जेकर यांनी सांगितले. आणखी एका युद्धाला तोंड देण्याची अमेरिकेची क्षमता नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यावर निर्बंध लादून अमेरिका आखाती देशातील तणाव वाढवत आहे. स्वार्थासाठी इराणवर दबाव टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही कोणत्याही दबावाखाली येणार नाही असेही इराणने स्पष्ट केले आहे. आमची ताकद कमी लेखण्याची चूक अमेरिकेने करू नये. ही चूक त्यांना महागात पडेल, असा इशारा इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अब्दुलरहीम मौसवी यांनी दिला आहे.

आखाती देशातील तणाव वाढत असून अमेरिकेने एअरक्राफ्टर करिअर तैनात केले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव युद्धापर्यंत वाढू नये, यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा असे आवाहन जागतिक स्तराहून करण्यात आले आहे. अमेरिका आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांनी युद्धाची शक्यता फेटाळून लावली आहे. इराणकडून अमेरिकेचे निर्बंध मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अणुकरारावर इराणने चर्चा करावी, यासाठी अमेरिका इराणवर दबाव वाढवत आहे. मात्र, इराणचे सर्वेसर्वा यातुल्लाह खोमेनी यांनी अमेरिकेशी चर्चेला नकार दिला आहे. ट्रम्प यांनी अणुकारार रद्द केल्याने चर्चेला तयार नसल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेचे निर्बंध, तेलआयातीवर घातलेली बंदी आणि वाढता जागतिक दबाब यामुळे इराण त्यांचे क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रम थांबवेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.