‘आप’चा प्रताप, आयएएस ऑफिसर गेले संपावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी आम आदमी पक्षाच्या दोन मंत्र्यांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समोरच आपच्या मंत्र्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणानंतर दिल्लीतील सर्व आयएएस ऑफिसर संपावर गेले आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत केजरीवाल यांनी जाहिरातीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. त्या चर्चेदरम्यान आपच्या दोन मंत्र्यांनी प्रकाश यांच्याशी गैरवर्तन केलं. या दोन मंत्र्यांमध्ये अमानतुल्लाह खान यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर आयएएस असोसिएशनने या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंशु प्रकाश यांनीही या घटनेची तक्रार उपराज्यपालांना केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही उत्तर आलं आहे. केजरीवाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, चर्चेदरम्यान मंत्री आणि सचिवांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी मुख्य सचिवांनी आपचे मंत्री प्रकाश जरवाल आणि अजय दत्त यांच्यासोबत गैरवर्तन केलं. पण, मंत्र्यांनी कोणतीही गैरवर्तणूक केलेली नाही. मंत्र्यांनीही या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे.