दिल्ली डायरी : बुआ-भतीजा, दीदी-बाबूंचे काय होणार?

20

>> नीलेश कुलकर्णी

दिल्लीत सत्तांतर घडवून आणण्याच्या विरोधकांच्या भ्रामक स्वप्नांचा फुगा जनतेने 23 मे रोजी फोडला. तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशात महागठबंधनच्या नावाने कागदावर डरकाळी फोडणारे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव किंवा बसपाच्या सर्वेसर्वा मायावती हे सर्वच या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय राजकारणात नवचाणक्याच्या भूमिकेत फिरत होते. मात्र निकालानंतर ते सर्वच पडद्याआड गेले आहेत. उत्तर प्रदेशमधील बुआ-भतीजा आणि ममतादीदी – चंद्राबाबू यांचे पुढे काय होणार? हा प्रश्न या निकालांनी उपस्थित झाला आहे.

केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत आणि देशाला स्थिर सरकार लाभू नये यासाठी बंगळुरूत राजकीय संधीसाधूंचा मेळा गेल्या वर्षी भरला होता. मात्र या महागठबंधनची गठडी जनतेनेच यमुनेत विसर्जित केली. एनडीएच्या विजयाचा तडाखाच इतका जबरदस्त आहे की, विरोधक अजूनही भांबावलेले आहेत. देशातील 17 राज्यांतून काँग्रेस नावाचा सर्वाधिक जुना राजकीय पक्ष हरवला आहे. राजकारणात जय-पराजय होतच असतात. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेली सरकारेही नमवता येतात हे 1962 आणि 1967 साली संयुक्त समाजवादी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत दाखवून दिले होते. त्यावेळी त्या पक्षाच्या चार-पाच खासदारांना इंदिरा गांधींसारख्या ‘आयर्न लेडी’ही वचकून असायच्या आणि त्यांचे बलाढय़ सरकारही त्यांच्यापुढे नमते घेत असे याचे कारण म्हणजे या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा खासदारांकडे असलेली नीतिमत्ता. ही नीतिमत्ता दाखवली तरच बुआ-भतीजा आणि बाबू-दीदींना राजकीय भवितव्य असेल अन्यथा 2024 मध्ये त्यांचा यापेक्षाही जास्त पालपाचोळा होईल.

जनतेने दुसऱयांदा प्रचंड बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवलेल्या मोदी सरकारच्या विजयाचे अनेक राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. गांधी घराण्याची ‘जहागिरी’ असलेल्या अमेठीमध्ये झालेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव हा राहुल यांच्यासह सर्व विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. पंतप्रधान मोदी यांनी हुशारीने ही निवडणूक केवळ स्वतःभोवती फिरत राहील याची दक्षता घेतली आणि मोदींच्या गुगलीवर विरोधक फसले. प्रत्येक विरोधी नेत्याने पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करण्यापलीकडे काही केले नाही. उत्तर प्रदेशमध्ये आत्या आणि भाच्याची जोडी भाजपला नेस्तनाबूत करील असा अंदाज वर्तवला जात होता. तो साफ खोटा ठरला. पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे उत्तर प्रदेशात मोठे ‘डॅमेज’ टळले. पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारून भाजपने ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला जबरदस्त खिंडार पाडले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत आपले काय होईल याचा घोर ममतादीदींना लागला आहे. अर्थात त्यासाठी नेहमीचा आक्रस्ताळेपणा सोडून साकल्याने विचार करणे त्यांच्या हिताचे ठरेल. तिकडे आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंना मोठा हादरा देत वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनी राज्य पादाक्रांत केले आहे. त्यामुळे नवचाणक्य चंद्राबाबूंना आपली चाणक्यनीती स्वतःचा पक्ष अस्तित्वात राखण्यासाठी वापरावी लागेल.

चमत्कार आणि झंझावात
लोकसभा निवडणुकीबरोबरच झालेल्या ओडिशा व आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानेही विरोधकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमळ फुलावे यासाठी भाजपने आजवर सर्वोतोपरी प्रयत्न केले. यावेळी तर नवीनबाबू घरीच बसतील अशी हवाही ‘फनी वादळा’च्या अगोदर निर्माण केली होती. प्रत्यक्षात ही ‘हवा’ म्हणजे एक ‘फन’च होती हे निकालानंतर सिद्ध झाले. फनी चक्रीवादळात केलेल्या पुनर्वसनाच्या जबरदस्त कामगिरीमुळे नवीनबाबू सर्वत्र कौतुकाचा विषय बनले. त्यामुळे ओडिया ही राजभाषा अवगत नसूनही तेथील जनतेने नवीनबाबूंचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सलग पाचव्यांदा निर्विवादपणे निवडले. प्रचारकी थाटाऐवजी एक कमिटमेंट समजून काम केले की, जनता तुम्हाला समर्थन देतेच हे नवीनबाबूंचा सलग पाचवा विजय सांगतो. त्याच वेळी तिकडे आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डींनी ‘टेक्नोक्रॅट’ तसेच हैदराबादला ‘सायबर सिटी’ बनविणाऱया चंद्राबाबूंच्या पक्षाचा पुरता धुव्वा उडवला. जगनमोहन यांचे वडील राजशेखर रेड्डींनी चंद्राबाबूंच्या लोकप्रिय सत्तेला काही वर्षांपूर्वी असाच सुरुंग लावला होता. जगनमोहन यांच्यासारखा ‘मास लीडर’ काँग्रेसने स्वतःच्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावला. त्यामुळे काँग्रेस सोडून त्यांनी नवीन पक्ष काढला व आंध्र जिंकले. काँग्रेस देशातील 17 राज्यांमध्ये का संपली याचे हे एक कारण आहे. अर्थात त्यापासून काँग्रेसजन बोध घेतील का? हा प्रश्नच आहे.

माजी मुख्यमंत्र्यांना ‘चौदावे रत्न’
लोकसभेची यंदाची निवडणूक देशभरातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तडाखे देणारीच ठरली. या माजी मुख्यमंत्र्याचे ग्रह-तारे आणि लोकसभेच्या कुंडलीशी का जुळत नाहीत हे माहीत नाही. मात्र विविध राज्यांच्या तब्बल 14 माजी मुख्यमंत्र्यांना जनतेने लोकसभेत जाण्यापासून रोखले. वास्तविक माजी मुख्यमंत्री ही त्या त्या राज्याच्या राजकारणात मोठी असामी असते. त्यांचा एक राजकीय आब आणि सामाजिक स्थानही असते. शिवाय दिमतीला ‘प्रोटोकॉल’ही असतो. तरीही जनतेने देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या देवेगौडांसह तब्बल 14 माजी मुख्यमंत्र्यांना यावेळी ‘चौदावे रत्न’ दाखवून दिले. दिल्लीच्या एकेकाळच्या लोकप्रिय मुख्यमंत्री शीला दीक्षित व हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनादेखील जनतेने घरी बसवले. विशेष म्हणजे दीक्षित आणि हुड्डा अनुक्रमे पंधरा व दहा वर्षे मुख्यमंत्रीपदावर होते. महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण या माजी म्ख्युमंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला. पृथ्वीराज चव्हाण यांना या पनवतीची बहुधा कल्पना आली असावी. म्हणून त्यांनी लोकसभेतून ऐनवेळी अंग काढून घेतले व स्वतःची अब्रू वाचवली. त्याशिवाय दिग्विजयसिंग, शिबू सोरेन या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांनाही जनतेने त्यांची जागा दाखवून दिली, जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना कश्मिरी पंडितांचा शाप भोवला, तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचेही तसेच झाले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी व कर्नाटकात माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईलीही पराभूत झाले. मेघालयात मुकुल संगमा यांना पी. ए. संगमा यांची कन्या अगाथा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री नबाब तुकी यांचीही अशीच करुण अवस्था झाली, तर बिहारमध्ये अल्पकाळात सत्तेवर आलेले आणि आंब्यावरून नितीशकुमारांशी भांडण झाल्यामुळे नावलौकिक प्राप्त केलेले जीतनराम मांझी यांनाही जनतेने सन्मानाने घरी बसवले आहे. एकंदर 17 व्या लोकसभेची निवडणूक 14 माजी मुख्यमंत्र्यांना ‘चौदावे रत्न’ दाखविणारी ठरली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या