लेख : ‘डावे’ कुठे हरवले आहेत?


नीलेश कुलकर्णी, [email protected]

डावे पक्ष आजवर हिंदुस्थानच्या राजकारणात स्वतःचा एक आब राखून होते. मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत डाव्या पक्षांच्या तंबूत कमालीची सामसूम आहे. त्यामुळे ‘डावे कुठे हरवले आहेत?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. डावे केवळ हरवलेलेच नाहीत, तर ‘भरकटलेले’ही आहेत. कन्हैया कुमारच्या उदाहरणावरून हे स्पष्ट झाले आहे. वादग्रस्त आणि पक्षीय पातळीवर शून्य योगदान असलेला कन्हैया कुमार हा डाव्यांचा चेहरा आणि शैला रशीद, स्वरा भास्कर हे डाव्यांचे स्टार प्रचारक असतील तर डाव्यांना पुढे कोणीही वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

हिंदुस्थानच्या राजकारणात तिसऱया आघाडीचा ‘डोळा’
उघडण्यात डाव्यांचा नेहमीच हातभार राहिला आहे. मात्र यंदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महागठबंधन नावाचा जो काही प्रकार आकाराला आला आहे तो नेमका ‘तिसरा’ आहे की ‘चौथा’ हे त्यात सामील झालेल्या नेत्यांनाही ठाऊक नाही. प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी डाव्यांचा अगोदर सफाया केला. आता ममता यांच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणाविरुद्धची हिंदू व्होट बँकेची ‘स्पेस’ भाजप मोठय़ा हुशारीने भरून काढत आहे. त्यामुळे डाव्यांचे तिकडचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. केरळमध्ये शबरीमाला मंदिर प्रवेशाचा विषय नाहक उकरून डाव्यांनी आपली कबर खणून ठेवली आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतर हरवलेले डावे शोधण्यासाठी ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ राबवावा लागेल की काय अशी स्थिती झाली आहे.

कालसुसंगत निर्णय न घेणे ही देशातील डाव्यांची खासीयत राहिली आहे. त्यामुळे 2004 पासून डाव्यांचा ग्राफ कमालीचा घसरतच चालला आहे. 2004 मध्ये डाव्यांची मतांची टक्केवारी सात टक्के होती, ती 2009 मध्ये चार टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी डावे अडीच टक्क्यांवर आले. ही ‘अधोगतीची गती’ याहीवेळी अशीच राहिली तर देशाच्या इतिहासात डावे पहिल्यांदाच एक टक्क्याखाली येतील. त्रिपुरात दारुण पराभव झाल्यानंतर डाव्यांच्या हाताशी केरळच्या रूपाने एकमेव राज्य आहे. तिथेही तेथील मुख्यमंत्री पी. विजयन यांनी स्वपक्षाला स्वतःच सुरुंग लावला आहे. शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाचा विषय खरं म्हणजे हिंदू धर्मापेक्षाही स्थानिक आस्थेचा. मात्र याच विषयाला विजयन महाशयांनी चूड लावली आणि शांत केरळमध्ये मोठा भडका उडाला. शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाला सुरुवातीला अनुकूल असलेल्या भाजपने नवीन व्होट बँकेच्या हिशेबाने पलटी मारली. मंदिरातील महिला प्रवेशाला विरोध दर्शवला आणि केरळातील प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान अनायसेच प्राप्त केले. डाव्यांची रणनीती ही सर्वच आघाडय़ांवर अशा पद्धतीने चुकत आहे. काँग्रेससोबत आघाडी करावी अशी ‘प्रॅक्टिकल’ भूमिका सीताराम येचुरी, सुधाकर रेड्डी या जाणत्या कॉम्रेडस्नी मांडली. मात्र त्याला विजयनसारख्या कॉम्रेडनी खोडा घातला. काँग्रेससोबतची आघाडी ही डाव्यांसाठी ‘बुडत्याला काडीचा आधार’ ठरली असती. मात्र ही काडीही डाव्यांनी आपल्या हाताने बुडवून टाकली आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डसारख्या राज्यांमध्ये भाजप एकेकाळी ‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी धडपडत असे. आता या राज्यांमध्ये, विशेषतः ‘सेव्हन सिस्टर्स’मध्ये भाजपने मोठय़ा प्रमाणावर राजकीय बस्तान बसविले आहे. अर्थात एवढी राजकीय अधोगती झाली तरी ती मानतील ते डावे कसले! त्यांना कन्हैया कुमारसारख्या वादग्रस्त युवकामध्ये ‘फ्युचर प्रॉस्पेक्ट’ दिसत आहे. आता यावर काय बोलणार?

वाचाळपणा सुरूच
‘‘बेताल बडबडू नका, तोंडाला कुलूप घाला’’ असा आदेश कित्येकदा पंतप्रधानांनी दिल्यानंतरही भाजप नेत्यांनी ताळतंत्र सोडलेलेच आहे. या वाचाळवीरांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे अशी स्पष्ट कबुली अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. वाचाळवीरांमध्ये अव्वल क्रमांक पटकावलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला तोंडपट्टा सुरूच ठेवला आहे. सुरुवातीला हनुमानाची जात काढून नसती उठाठेव करणाऱया योगींनी आता उत्तर प्रदेशात ‘बजरंग बली की अली?’ असा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास आणि कामगिरीच्या नावावर जिंकता येत नसेल तर ध्रुवीकरणाचा मार्ग सोपा असा त्यांचा कयास असावा. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीदेखील मुस्लिम मतांची मला गरज नाही असा पवित्रा घेतला आहे. योगी व मनेकांनी वादग्रस्त वक्तव्ये केली असताना साक्षी महाराजांनी ‘‘मला मतदान केले नाहीत तर तुम्हाला संन्याशाचा शाप लागेल’’ अशी शापवाणी उच्चारली आहे. या महाराजांकडे वाचाळ बोलण्यापलीकडे कोणतीही कर्तबगारी नाही. ‘नमो युग आरंभ’ असा मोठा फलक लावलेली गाडी घेऊन ते संसदेत येत असत आणि नावापुढे महामंडलेश्वर लिहिण्यास विसरत नाही. अशा साक्षी महाराजांनी मतदारालाच ‘शाप’ दिल्याने भाजपची पंचाईत झाली आहे.

नाराजी आणि शेती
भाजपमध्ये पंच्याहत्तरी पार मंडळींनी ‘मार्गदर्शक मंडळी’त पाठविण्याचा धडाका सध्याच्या नेतृत्वाने लावला आहे. त्याला अपवाद लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजनदेखील राहिल्या नाहीत. मूळच्या कोकणातल्या, पण मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान सुमित्राताई निर्माण करू शकल्या ते त्यांच्या साधेपणामुळे. लोकसभेच्या अध्यक्षा असताना त्यांच्यावर विरोधकांनी पक्षपातीपणाचे आरोप केले. मात्र तरीही ‘ताई’ म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. सुमित्रा महाजन आणि काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील खडाजंगी ऐकणे नेहमीच मनोरंजक असे. मात्र असे असूनही सुमित्रा महाजनांचे तिकीट कापण्यात आले. ते कापले यापेक्षा ज्या पद्धतीने त्यांना तिकिटासाठी ताटकळत ठेवण्यात आले ते अधिक क्लेशदायक होते. सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या सुमित्राताईंनी मग रागरंग ओळखून आपण निवडणूक लढविणार नाही असा निर्णय जाहीर केला. सोळाव्या लोकसभा अध्यक्षांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर ही अशी निवडणूक न लढवता झाली. दुसरीकडे पंधराव्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या भाजपच्या करिया मुंडा यांनी पक्षाचा निर्णय लगेच मान्य करत दुसऱयाच दिवशी हातात टिकाव व फावडे घेऊन आपली शेती गाठली. अध्यक्ष असतानाही करिया मुंडा अधिवेशन नसताना शेतात काम करायचे. ‘‘आता मला पूर्ण मोकळीक मिळाली आहे. उर्वरित आयुष्य मातीसाठी समर्पित करणार आहे’’ अशी भावना करिया मुंडा यांनी बोलून दाखवली आहे.