दिल्ली डायरी : लेट… सेट… गो!

>> नीलेश कुलकर्णी 

आता कोणतीही लाट तर दूर, साधी झुळूकही नाही. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था थरथरत असताना, बेरोजगारांच्या आशा-आकांक्षांचे पकोडे तळले जात असताना शेतकर्‍यांचा, मध्यम वर्गाचा विश्वासघात झालेला असताना संपलेले संसदेचे अखेरचे अधिवेशन म्हणजे निवडणुकीसाठी आता ‘लेट सेट गो’ ची घोषणाच आहे. जनताजनार्दन पुढच्या लोकसभेत कोणाला सत्ताबाकांवर बसवते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.  

अनेक वर्षांनंतर प्रचंड बहुमताने 2014 साली जनतेने निवडून दिलेल्या 16 व्या लोकसभेचे अखेर सूप वाजले आणि दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंगही आपोआप फुंकले गेले. सतराव्या लोकसभेचा कौल मिळविण्यासाठी ‘लेट सेट गो’ ची घोषणा झालेली आहे. मजबूत बहुमत हाताशी असूनही पाच वर्षांत देशाला निर्णायक दिशा देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका सर्व स्तरातून होत असताना ‘आता आपले पुढे काय?’ या विचाराने सर्वाधिक चिंतातुर चेहरे सत्तापक्षाच्या खासदारांचे दिसत होते. पाशवी बहुमतातून एकाधिकारशाहीचा जन्म होत असतो. पाच वर्षांत देशाने तेच अनुभवले. ‘अडीच माणसांचे सरकार’ अशी या सरकारची संभावना झाली आणि हीच ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. सत्तापक्षाचे असूनही काम होत नाही, या विवंचनेत खासदार राहिले. सोळाव्या लोकसभेच्या निरोप समारंभात पंतप्रधानांनी ‘पाच वर्षांपासून भूकंप येणार असे ऐकत होतो मात्र, भूकंप काही आला नाही’ अशी टोलेबाजी राहुल यांना उद्देशून केली खरी, मात्र आगामी लोकसभा निवडणुका या सत्ताधार्‍यांसाठी खरा भूकंप ठरू शकतात. जनतेने सरकार उलथून टाकायचे ठरवले तर राहुल यांचे भाकित खरे ठरू शकेल. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने सत्तापक्षाच्या आसनाला सत्तांतराच्या भूकंपाचे ‘सौम्य धक्के’ दिले आहेत. त्यातून सत्तापक्षाने वेळीच सावरलेले बरे. लोकसभेत निरोप समारंभात समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंगांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हावा अशी खास ‘मुलायम’ अशी समाजवादी शाल खांद्यावर टाकत शुभेच्छा दिल्या आहेत. मुलायम यांनी पंधराव्या लोकसभेच्या सांगता समारंभात मनमोहनसिंगांना पुन्हा पंतप्रधान व्हा, अशाच ‘सेम टू सेम’ शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर  मनमोहनसिंग यांचे काय झाले, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

एका मजबूत लोकसभेचा कार्यकाल आता संपला आहे. पाच वर्षांत देशाचे सरकार संपूर्णपणे पंतप्रधान कार्यालयाने नियंत्रित केले. भाजपाध्यक्ष अमित शाह हे ‘दुसरे सत्ताकेंद्र’ तर अरुण जेटलींच्या रूपाने ‘अर्धसत्ता केंद्रा’चा पट मांडला गेला. केंद्रातील मंत्र्यांना सरकारात काडीचीही किंमत नव्हती तिथे खासदार तर कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. काही दाद, फिर्याद मांडायला जावी तर ‘आप किसके कारण सासंद बने है?’ असा प्रतिसवाल करून गप्प केले जायचे. लोकसभेचे सूप वाजल्यानंतर यूपीचे दोन खासदार भेटले. ‘इलेक्शन की तैयारी कैसी है’ असे सहज विचारल्यावर ‘भाईसाब, पिछले पाच साल में एक भी काम नही बना. उपर से  पिछले चुनाव का ही कर्जा माथे पे है. तो कायका चुनाव?, अब संसद में आने की कोई इच्छा ही नही बची..’ हे सत्तारुढ पक्षांच्या दोन खासदारांचे मनोगत सत्ताधार्‍यांनी ध्यानात घेण्यासारखे आहे. सत्ताधारी खासदारांचीच ‘देमाय धरणी ठाय’ अशी अवस्था असेल तर कोणाच्या जिवावर सत्तापक्ष निवडणुका लढवणार हा प्रश्न आहे.

मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा निवडून येण्याचा एकंदरीतच भरवसा नाही. पाच वर्षांपूर्वी आलेल्या लाटेचे आता साधे अवशेषही उरलेले नाहीत. आता कोणतीही लाट तर दूर, साधी झुळूकही नाही. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था थरथरत असताना, बेरोजगारांच्या आशा आकांक्षांचे पकोडे तळले जात असताना शेतकर्‍यांचा, मध्यम वर्गाचा विश्वासघात झालेला असताना संपलेले संसदेचे अखेरचे अधिवेशन म्हणजे निवडणुकीसाठी आता ‘लेट सेट गो’ ची घोषणाच आहे. जनता जनार्दन पुढच्या लोकसभेत कोणाला सत्ता बाकांवर बसवते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

अडवाणी, सिन्हांचे ‘खामोश!’

16 व्या लोकसभेचे सूप वाजल्यानंतर अनेक मनोरंजक माहिती पुढे येत आहे. भाजपला शिखरावर नेण्यात मोलाचे योगदान असलेले ‘भाजपाचे भीष्माचार्य’ पाच वर्षांत अडगळीतच पडले होते. आडवाणींचा शक्य तितका अपमान सत्ताधार्‍यांनी केला. मात्र, असे असले तरी आडवाणींची लोकशाहीप्रती आणि पक्षाविषयीची निष्ठा तसूभरही ढळली नाही. लाटेत निवडून आलेले खासदार प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर बाहेर चकाट्या पिटत असताना, आडवाणी नित्यनियमाने लोकसभेत येत राहिले. मात्र, त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. तीच बाब माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, सोनिया व राहुल गांधी यांची. विरोधकांची मोदी सरकारमध्ये मुस्कटदाबी होत असली तरी त्यांना प्रश्न विचारण्यापासून कोणीच परावृत्त केले नव्हते. मात्र, या मंडळींनी तोंड उघडले नाही. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मोदी सरकारविरोधात उठसूट मीडियात आपली तोंडाची तोफ डागणारे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा देखील ‘खामोश’ म्हणत प्रश्न विचारण्याच्या बाबतीत मौनातच होते. मतदारसंघातील निधी पंतप्रधान मोदी केवळ 62 टक्केच खर्च करू शकले आहेत तर मोदींशी स्पर्धा करणारे पंतप्रधान पदाचे दावेदार राहुल गांधी यांची निधीखर्चाची टक्केवारी 60 आहे. अमेठीत गांधी घराण्याने आजवर काही केले नाही, असा आरोप नेहमीच विरोधक करत होते. आता वाराणसीच्या बाबतीतही हे आरोप होतील, त्याची तयारी भाजपाईंनी ठेवलेली बरी.

मोहंमद सलीम मदतीला धावले

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही. कायमचे असतात ते फक्त हितसंबंध, सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या दिवशी त्याचा प्रत्यय सभागृहातच आला. माकपाचे मोहंमद सलीम तसे अभ्यासू आणि आक्रमक खासदार. पाच वर्षांत सलीम यांची तोफ मोदी सरकारवर चांगलीच धडाडली. त्यामुळे सलीम भाषणाला उठले की, सत्तापक्षाकडून त्यांची टिंगल केली जायची. मात्र, अखेरच्या दिवशी घडले आक्रितच! सलीम यांच्या प्रत्येक शब्दाला भाजपाची खासदार मंडळी बाके वाजवून समर्थन देत होती. राफेलच्या मुद्यावरून तृणमूलचे खासदार ‘चौकीदार ही चोर है’ अशा घोषणा देत होते. त्यावेळी भाजपाच्या मदतीला ‘संकटमोचक’ म्हणून हे सलीम धावून आले. तृणमूलने चिटफंड घोटाळा करून बंगालला कंगाल केले, अशी टीका करत ममता बॅनर्जी लुटारू असल्याचा आरोप केला. त्याला सत्ताधार्‍यांनी दोन दोन हातांनी बाके वाजवून समर्थन दिले. काँग्रेसच्या अधीररंजन चौधरींनीही ममतांविरोधात आवाज काढल्यावर भाजपा खासदारांनी टाळ्या पिटल्या. अखेरच्या दिवशीचे फोटोसेशनही तितकेच गाजले. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये युद्धाची परिस्थिती असताना मुनमून सेन आणि शताब्दी राय या अभिनेत्री खासदारांनी अडवाणींसोबत फोटो घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मात्र, भाजपाच्या कोणत्याही खासदाराला भाजपाच्या भीष्माचार्यांसोबत फोटो काढावासा वाटला नाही.

[email protected]