लेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे

4

>> नीलेश कुलकर्णी  

केंद्रात 2014 मध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार बनल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमुक्त हिंदुस्थानच्या डरकाळ्या फोडल्या. ईशान्येसारख्या भाजपचा कोणताही बेस नसलेल्या ‘सेव्हन सिस्टर’मध्येदेखील बहुतेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे  स्थापन झाली. त्यामुळे काँग्रेसमुक्त ईशान्यचे स्वप्न जवळजवळ साकार झाले होते. मात्र आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या हटवादीपणामुळे ईशान्य हिंदुस्थान ‘भाजपमुक्त’ होण्याच्या वाटेवर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या भागातील जास्तीत जास्त जागा मित्रपक्षांच्या मदतीने जिंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी घेतलेली मेहनत ईशान्येतील या बदलत्या राजकीय वाऱ्यांमुळे पाण्यात जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंकेतील मुस्लिम वगळता इतर धर्मीय आश्रितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देणारे विधेयक मोदी सरकारने घिसाडघाईने लोकसभेत मंजूर केले आणि पूर्वेकडची एरवीही हिंदुस्थानशी काहीसे अंतर राखून राहणारी राज्ये पेटली. तिथे जाळपोळी सुरू झाल्या. जागतिक हिंदूंचे तारणहार अशी ‘इमेज’ बनविण्याच्या नादात मोदी सरकारने आगीशी खेळ केला आहे. त्यामुळे आसाम गण परिषदेने तिथल्या सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर अरुणाचलमध्ये गेगांग अपांग यांनी भाजपने आपली साधनशूचिता खुंटीला अडकवून ठेवल्याचा आरोप करत भाजपशी राजकीय काडीमोड घेतला आहे. अटलजींचा भाजप आता राहिला नाही, तर तो सौदेबाजांचा झाल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली आहे. मेघालयात मुख्यमंत्री कोराड संगमांनीही भाजपला इशारा दिला आहे. जम्मू-कश्मीरची वाट लावल्यानंतर भाजपचे नेते राम माधव यांनी ईशान्येला आगीच्या खाईत लोटले आहे. गेगांग अपांग यांनी या माधवांवर लावलेले दादागिरीचे आरोप गांभीर्याने घेण्यासारखे आहेत. अमित शाह यांची गेल्या साडेचार वर्षांतील मेहनत या सर्व घडामोडींमुळे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या सल्लागारांमुळे मातीमोल झाली आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह इतर महत्त्वाच्या राज्यांत बसणारा राजकीय फटका लक्षात घेऊन त्याची ‘भरपाई’ करण्यासाठी भाजपाध्यक्षांनी ‘मिशन सेव्हन सिस्टर’ हाती घेतले होते. मात्र या मोहिमेचे आता मातेरे होताना दिसत आहे.

raghuram-rajanधाव पाव रे रघुरामा..!

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी राजकीय कारणांमुळे ते चर्चेत आले आहेत. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसची ‘नाडी’ हळूहळू का होईना चालू झाल्याने कॉंगेसजनांना राहुल गांधीच पंतप्रधान होणार अशी स्वप्ने पडत आहेत. वास्तविक, पंतप्रधानपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून विरोधी पक्षाने किमान डझनभर मंडळी आताच सत्तासुंदरीला वरमाला घालण्यासाठी उत्सुक आहेत. कॉंग्रेसजनांना मात्र राहुलच पंतप्रधान होतील असा भरवसा वाटत आहे. राहुल यांची कामगिरी गेल्या काही महिन्यांत नक्कीच सुधारली आहे. खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भक्तमंडळींनी राहुल यांना सीरियसली घेतले नसते तर राहुल गांधी कदाचित एवढे मोठे नेते बनलेही नसते. मात्र आता ‘पीएम इन वेटिंग’ राहुल यांच्या मदतीसाठी रघुराम राजन धावून आले आहेत. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात व्हिजन डॉक्युमेंटस्वर ते काम करणार असून मोदी सरकारने अपेक्षाभंग केलेल्या युवक आणि शेतकरी वर्गाला आकर्षित करणारे ‘व्हिजन’ ते राहुल यांना देणार आहेत. रघुराम यांच्या विद्वत्तेबाबत तिळमात्र शंका नाही मात्र गव्हर्नर असतानाही त्यांनी कांग्रेसच्या कलाप्रमाणे कारभार केला काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणारे म्हणून त्यांची ओळख कायमच राहील. मात्र राहुल यांनी रघुराम यांना दिलेले अवास्तव महत्त्व काही जुन्या काँगेसजनांना पटलेले नाही. ऐनवेळी खिचडी सरकार बनले तर राहुल यांच्या नावाला पंतप्रधानपदासाठी घटक पक्षांकडून विरोध होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन उच्चविद्याविभूषित मध्यम व उच्च मध्यमवर्गात क्रेझ असणाऱ्या रघुराम राजन यांना पंतप्रधानपदासाठी पुढे करण्याचा राहुल यांचा ‘प्लॅन’ असल्याचे समजते. त्यामुळे ‘धाव पाव रे रघुरामा’ अशी साद सध्या राहुलनिष्ठ कॉंग्रेसजनांनी घातलेली दिसत आहे. तथापि रघुराम राजन कॉंग्रेसला कितपत ‘पावतात’ व फलदायी ठरतात ते भविष्यातच समजेल.

advani‘फूल गुलाब का…’

भाजपचे लोहपुरुष लालकृष्ण आडवाणी गेल्या साडेचार वर्षांत पक्षात आणि सत्तेत अडगळीतच पडले आहेत. मात्र पाच राज्यांतील पराभवाच्या दणक्याने म्हणा किंवा बदलत्या परिस्थितीचा अंदाज म्हणा, भाजपच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आडवाणींना तुलनेने सन्मानाची वागणूक देण्यात आली. आडवाणी हात जोडून उभे आहेत, मात्र पंतप्रधान त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत असे अनेक व्हिडीओ गेल्या काही वर्षांत व्हायरल झाले. मात्र दिल्लीच्या अधिवेशनात ‘आडवाणीजी छा गये’ अशी परिस्थिती होती. अधिवेशनातील सामील मान्यवरांचे स्वागत भाजपची निशाणी असलेले कमळाचे फूल देऊन केले जात होते. मात्र त्याला अपवाद ठरले आडवाणी. त्यांचे स्वागत कमळाऐवजी गुलाब देऊन करण्यात आले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी आजही आडवाणीच भाजपचे सर्वोच्च नेते आहेत याची परस्पर ग्वाही देऊन टाकली. या घोषणांमुळे आडवाणीही सद्गदित झाले. मात्र कमळ सोडून आडवाणींना गुलाब देण्याचे कारण काय याची चर्चा त्यानंतर रंगली. गुलाबाप्रमाणेच आडवाणींच्या राजकीय जीवनातही आजूबाजूला काटेच काटे आहेत. त्यामुळेच कदाचित सांकेतिक स्वरूपात हा गुलाब त्यांच्या हाती सुपूर्द केला गेला. आता आडवाणी या गुलाबाचा प्रेमाचा गुलकंद करून आपल्या शिष्योत्तमांना खाऊ घालतात का, हे पाहावे लागेल.

[email protected]