दिल्ली डायरी : पंजाब काँग्रेसमधील ‘भांगडा’

279

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

रविवारच्या सातव्या टप्प्यांतील मतदानाने नव्या लोकसभेचा कौल ‘ईव्हीएम बंद’ झाला आहे. या टप्प्यात पंजाबही होता. देशभरात केवळ याच राज्यात काँग्रेसला थोडेफार ‘अच्छे दिन’ आले ते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यामुळेच. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला होणाऱया नुकसानासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांची बेताल बडबड कारणीभूत ठरेल असा थेट आरोप मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आता केला. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेस पक्षातील ‘भांगडा’ पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला. आता त्याचे परिणाम मुख्यमंत्री म्हणतात तसे खरोखर दिसतात का हे 23 मे रोजी स्पष्ट होईल.

देशभरात केवळ पंजाबमध्ये तिथले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे काँगेसला ‘अच्छे दिन’ आलेले असताना आता त्यावरही बोळा फिरण्याची चिन्हे आहेत. काँगेसचे बेताल बोलभांड नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळे काँगेसमध्ये ‘वादविवादाचा भांगडा’ सुरू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धू वाट्टेल तसे बरळत आणि बडबडत काँगेसलाच अडचणीत आणत आहेत. जुन्या दोस्तीची ‘याद’ राखत हे सिद्धूमहाशय मुख्यमंत्र्यांची परवानगी डावलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची गळाभेट घेऊन आले. मात्र तेव्हापासून त्यांनी ताळतंत्रच सोडला आहे. पुलवामाच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापासून पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करेपर्यंत सिद्धू यांनी मजल मारली आहे. सिद्धू भाजपवर टीकेची झोड उठवत असेपर्यंत काँगेसवाले भलतेच खूश होते, मात्र सिद्धूसारखे लोक हे ‘अनगाईडेड मिसाईल’ असतात त्याचा प्रत्यय आता येत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यामुळेच माझे तिकीट कापले गेले असा आरोप करून सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी पंजाब काँगेसमधील वादाला चूड लावली आहे. या वादात उडी घेऊन नवज्योत सिद्धू यांनी माझी पत्नी कधीही खोटे बोलत नाही अशी आरोळी ठोकत ‘पतीधर्म’ निभावला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे आरोप फेटाळले असले तरी त्यामुळे पंजाब काँगेसमधला संघर्ष काही संपणार नाही. पंजाबचे मुख्यमंत्रीपद मिळविण्याची खुमखुमी नवज्योत सिद्धूंच्या मनात अनेक दिवसांपासून आहे, मात्र कॅप्टन मुरब्बी असल्यामुळे सिद्धू अधिकच बिथरले आहेत.

शत्रुघ्न सिन्हांची ‘मन की बात’
भाजप नेतृत्वावर टीकेची तोफ डागत काँग्रेसवासी झालेले शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली ‘मन की बात’ सर्वांसमोर जाहीर केली आहे. मी भाजप सोडताना भाजपचे लोहपुरुष लालकृष्ण आडवाणी यांच्या डोळ्यांत अश्रू होते, मात्र त्यांनी मला पक्ष सोडण्यापासून परावृत्त केले नाही असे सांगून नव्या विषयाला तोंड फोडले आहे. पटनासाहिबमधून तिसऱयांदा लोकसभेत नशीब अजमावू पाहणारे शत्रुघ्न सिन्हा हे तसेही आडवाणी गटाचे मानले जात होते. त्यामुळेच मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांना पद्धतशीरपणे अडगळीत टाकण्यात आले. पुन्हा केंद्रात मंत्रीपद न मिळाल्यामुळेही सिन्हा चरफडत होतेच. त्यातच त्यांच्यापेक्षा ज्युनियर रविशंकर प्रसाद यांना मंत्रीपद देणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच झाले. तेव्हापासून सिन्हांनी मोदींवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. पटनासाहिबमधून सिन्हा आता राजकीय अस्तित्वासाठी धडपडत आहेत. काँगेसवासी झाल्यानंतर सिन्हा यांच्या प्रचारकार्यालयाच्या उद्घाटनावेळीच काँगेस कार्यकर्त्यांमध्येच लस्सी पिण्यावरून हाणामारी झाल्यामुळे सिन्हा यांच्या बाबतीत ‘नमनालाच घडाभर तेल’ असा प्रकार घडला आहे. पक्ष सोडताना मी आडवाणींना आवर्जून भेटलो असे सांगत सिन्हा यांनी आडवाणींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी पक्ष सोडण्यापासून त्यांनी रोखले नाही असे दूषणही आडवाणींना दिले. मात्र गेल्या काही वर्षांपासून दस्तुरखुद्द आडवाणीच अडगळीत पडलेले असताना ते सिन्हांना पक्षातून जाण्यापासून कसे काय रोखू शकतील हा साधा प्रश्न सिन्हांच्या मनात आला नसेल काय! पटनासाहिबचे रणांगण जिंकणे कठीण आहे. त्यामुळेच अशा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा लोकसभा गाठण्याचा शत्रुघ्न सिन्हांचा इरादा असावा.

महागठबंधनमधील बाशिंगधारे
दक्षिण हिंदुस्थानने दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव आणि एच.डी. देवेगौडा हे दोन पंतप्रधान देशाला दिले. हिंदुस्थानच्या राजकारणात हिंदीभाषिक पट्टय़ाचे व उत्तरेचे वर्चस्व असतानाही हे दोघेही ऑक्सिडेंटल पंतप्रधान बनले. अर्थात इतिहास घडविला तो नरसिंह रावांनी. चंद्रशेखर रावांच्या तेलंगणातूनच पुढे आलेल्या नरसिंह रावांनी बिकट स्थितीत देशाला स्थैर्य व आर्थिक उदारीकरणाची मोठी देणगी दिली. आज जागतिकीकरणाच्या गळेकापू स्पर्धेत हिंदुस्थान ताठ मानेने उभा आहे त्याचे श्रेय नरसिंह रावांचेच! मात्र केवळ आडनावात ‘राव’ असल्याने चंद्रशेखर राव यांना नरसिंह राव होता येणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हटले जात असले तरी 1996 नंतरच्या आघाडी सरकारचे खिचडी राजकारण देशाने अनुभवले आहे. त्यामुळे देशाची अधोगती झालेलीदेखील पाहिली आहे. स्थिर सरकार ही विकासाची निजखूण असते. तेव्हा यावेळी जनता सुज्ञपणाने कौल देणार आहे. त्यामुळे महागठबंधनमधल्या ‘बाशिंगधाऱयां’ची पंचाईत होण्याची चिन्हे आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे हे चुकीचे अजिबात नाही, मात्र या रावांची राजकीय ताकद मर्यादित आहे. त्यातच त्यांचे त्यांच्या इतक्याच राजकीय तरबेज असलेल्या चंद्राबाबूंशी सख्य नाही. दक्षिणेकडील द्रमुक वगळता कोणी चंद्रशेखरांच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाही, मात्र तरीही चंद्रशेखर रावांनी आपले घोडे पुढे दामटले आहे. रावांप्रमाणेच अनेकांनी अप्रत्यक्षपणे आपल्या टोप्या पंतप्रधानपदासाठी फेकल्या आहेत. अर्थात त्यांच्या या ‘त्रिशंकू’ सरकारच्या गृहीतकावर देशाच्या सुज्ञ जनतेने पाणी फिरवले तर या ‘टोपी’वाल्यांचे चेहरे पाहण्यासारखे होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या