दिल्ली डायरी : उत्तर प्रदेशातील ‘घडलंय बिघडलंय’

1

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशने दणदणीत यश देऊन दिल्लीच्या तख्तावर बसविले. या निवडणुकीत मात्र भाजपची व्होट बँक असलेला ब्राह्मण व ओबीसी मतदार अनुक्रमे काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या मागे उभा राहिल्याचे चित्र मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत दिसले. शिवाय मतदानाची टक्केवारीदेखील सुमारे चार टक्क्यांनी घसरली. गेल्या वेळी उत्तर प्रदेशात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मायक्रो मॅनेजमेंट’ने काम केले होते. यावेळीही अमित शहा मेहनतीमध्ये कोणतीही कसूर ठेवताना दिसत नाहीत. मात्र मुख्यमंत्री योगी यांचा कारभार त्यांच्या मेहनतीला अडथळा ठरत आहे. त्यामुळेच या राज्यात भाजपसाठी सध्या ‘घडलंय बिघडलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभे राहिल्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. त्याला कारणीभूत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कारभार तसेच राममंदिराचे आश्वासन प्रत्यक्षात न येणे या गोष्टी आहेत. भाजपची व्होट बँक असलेला ब्राह्मण व ओबीसी मतदार अनुक्रमे काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या मागे उभा राहिल्याचे चित्र मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत दिसले. गेल्या वेळी उत्तर प्रदेशात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मायक्रो मॅनेजमेंट’ने काम केले होते. यावेळीही अमित शहा मेहनतीमध्ये कोणतीही कसूर ठेवताना दिसत नाहीत. लखनौच्या भाजप मुख्यालयात शहा यांनी पहाटे तीनपर्यंत बैठक घेतली. अविश्रांत श्रमामुळे ते इतके थकले की शेवटी कार्यालयातच त्यांनी झोप काढली. मात्र एकीकडे मोदी-शहा जिवाचे रान करून उत्तर प्रदेशात पक्षाचा घसरलेला ‘ग्राफ’ उंचविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री योगी यांचा कारभार मात्र भाजपला रसातळाला नेणारा ठरत आहे. त्यामुळेच हिंदू म्हणून एकसंध असलेली भाजपची व्होटबँक फुटली आहे. त्याचा मोठा फटका भाजपला उत्तर प्रदेशात बसण्याची शक्यता आहे. या राज्यात ही भाजपसाठी ‘घडलंय बिघडलंय’ अशी स्थिती आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा सोपान चढण्यासाठी उत्तर प्रदेश ‘दुरुस्त’ करणे भाजपसाठी अत्यावश्यक आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उर्वरित टप्प्यात ते कसे शक्य करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

गेल्या निवडणुकीत अझरुद्दीनचा पराभव करणारे मुरादाबादचे भाजपचे खासदार सर्वेशकुमार सिंग यांनी ‘यह चुनाव टफ है, जितने कोई संभावना नहीं लग रही हैं।’, असे सांगत लढाईअगोदरच मैदानातून पळ काढला. त्यावरून त्या पक्षाची उत्तर प्रदेशात नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना येते. त्यातच भैरोप्रताप मिश्रा व ओमप्रकाश पांडे या खासदारांनी योगी हे केवळ ठाकुरांचे हित पाहतात. ते ब्राह्मणांसह इतर जातींचा द्वेष करतात, असा सनसनाटी आरोप केला. आपले तिकीट कापण्यामागे योगींचा हात असल्याचे सांगत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उत्तर प्रदेशातील जनतेने प्रचंड बहुमताचा कौल दिल्यानंतर तिथे योगींसारख्या मठाधीशाची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा पक्षाचा निर्णय किती चुकीचा होता याचे प्रत्यंतर भाजपला पदोपदी येत आहे. एकटय़ा उत्तर प्रदेशात 40-50 जागांचा फटका बसला तर तो कसा भरून काढायचा? या विवंचनेत सध्या भाजप नेतृत्व आहे. त्यातच नोटाबंदी, जीएसटीमुळे नाराज झालेला मध्यमवर्ग, शेतकरी आणि योगींच्या धोरणांमुळे इतर छोटय़ामोठय़ा जातींचे झपाटय़ाने होत असलेले ध्रुवीकरण भाजपला मारक ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात मतदान झालेले केंद्रीय मंत्री महेश शर्मा व व्ही.के. सिंग हे स्वतःच आपल्या विजयाबाबत साशंक आहेत. त्यामुळे योगींच्या भरवशावर उत्तर प्रदेशसारखे महत्त्वाचे राज्य न सोडता स्वतः मोदींनी यूपीची सूत्रे हाती घेतली तरच डॅमेज कंट्रोल शक्य होणार आहे. मोदी आणि शहा हे काम उरलेल्या कमी कालावधीत करू शकतील का, हाच खरा प्रश्न आहे.

मतदानासाठी काय पण..!
लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव म्हणजे आपल्याकडच्या निवडणुका! आपल्या देशात निवडणुकांचे पीक बारमाही असते. देशात कुठे ना कुठे कुठली तरी निवडणूक होतच असते. काही सन्मान्य अपवाद वगळता पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखवणारे राजकारणी मतदारांना खूश करण्यासाठी या लोकशाहीच्या उत्सवात विविध दशावतारच जणू सादर करतात. कर्नाटकाचे नागराज नावाचे एक महाशय तिथले मंत्री आहेत. मात्र कुमारस्वामी सरकारच्या नावावर मते मागण्यासारखे काही नसल्याने या नागराजांनी जबरदस्त नागीण डान्स केला. त्यामुळे या नागराज महाशयांची कीर्ती कर्णोपकर्णी पसरली. कर्नाटकातील डान्सपासून प्रेरणा घेत देशाचे गृहराज्यमंत्रीपद भूषविलेल्या काँग्रेसच्या आर. पी. एन. सिंग यांनी उत्तर प्रदेश मध्ये भलतीच गंमत केली. हे आरपीएन राजघराण्यातले वगैरे आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत घरी बसले. आता निवडून यायचे तर काही मुद्दे हाती असावेत, मात्र या मुद्दय़ांवर निवडणूक जिंकता येत नाही याची खात्री झाल्यामुळे या महाशयांनी आपली राजवस्त्रs खुंटीला टांगली आणि बाजारात जिलब्या तळण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यथेच्छ जिलब्या तळून झाल्यानंतरच आरपीएन यांनी झारा खाली ठेवला. एकीकडे अशा गमतीजमती सुरू असताना हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत माजी आमदार रतनलाल यांनी स्टेजवरच रडायला सुरुवात केली. त्यांना कसे आवरावे हे उपस्थितांना समजत नव्हते. पुन्हा तिकीट मिळाले नाही म्हणून ते रडत नव्हते हे चौकशीअंती समजले. मग त्यांच्या डोळय़ांत ‘गंगा जमुना’ का आल्या? खरोखरच खट्टरांचा कारभार इतका रडवेला आहे का, अशी खिल्ली सध्या यानिमित्ताने उडवली जात आहे.

दिग्गीराजांना साध्वीचे ‘आव्हान’
नर्मदा परिक्रमा सपत्नीक करून परतलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचे राजकीय भवितव्य सध्या चांगलेच गर्तेत सापडले आहे. मध्य प्रदेशातून काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर 2003 मध्ये दहा वर्षे कोणतेही सत्तेचे पद भूषविणार नाही, असा निर्धार दिग्विजय यांनी केला होता आणि तो पूर्णही करून दाखवला. मुख्यमंत्री असेपर्यंत दिग्विजय तसे सश्रद्ध गृहस्थ होते. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला ते प्रतिवर्षी येत असत. मात्र दिल्लीत गेल्यावर दरबारी राजकारण करताना अल्पसंख्याकांचे तारणहार बनून ‘राष्ट्रीय नेते’ बनण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या आड आली. महत्त्वाकांक्षा व प्रसिद्धीपोटी दिग्गीराजा इतके बहकले की कुख्यात लादेनला ‘ओसामाजी’ आणि हाफीज सईदला ‘श्रीमान’ म्हणण्यापर्यंत घसरले. बाटला एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापासून मुस्लिम लांगूलचालन करण्यासाठी वाट्टेल ती बेताल विधाने करण्यात गेल्या काही वर्षांत दिग्विजय सिंग यांचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनी जो हिंदुत्ववाद्यांविरोधात तोंडपट्टा चालवला त्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आहेत. या निवडणुकीत लढण्यासाठी दिग्गीराजा यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळची निवड केली. भोपाळच्या अंतर्गत येणाऱया आठपैकी पाच विधानसभांवर भाजपचा तर तीनवर काँग्रेसचा ताबा आहे. साडेचार लाख मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भोपाळमधून दिग्विजय आरामात जिंकतील असा होरा होता, पण भाजपने त्यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन भलतेच फासे टाकले आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप झाले होते. त्या काही वर्षे तुरुंगातही होत्या. याच साध्वींविरोधात दिग्विजय सिंग यांनी टीकेची झोड उठवली होती आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या साथीने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द जन्माला घातला होता. आता त्याच प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह भाजपतर्फे दिग्विजय यांना आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. दिग्विजय यांना पराभव पत्करावा लागल्यास तो हिंदुत्वाविरोधात गरळ ओकण्याबद्दल मिळालेला ‘शाप’ मानावा लागेल.