दिल्ली डायरी – राजस्थानात ‘चेहरा कमल’; वसुंधराराजेंना ‘हूल’

नीलेश कुलकर्णी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना अलगद अडगळीत टाकल्यानंतर दिल्लीकर चाणक्यांनी राजस्थानातही तेथील मातब्बर नेत्या वसुंधराराजेंना साईडलाईन केले आहे. राजस्थानात पंतप्रधानांनी जाहीर सभेत ‘‘कमल का फूल ही हमारा चेहरा है’’, असे सांगत वसुंधराराजेंना ‘‘शिवराज पॅटर्न’प्रमाणे एका फटक्यात अडगळीत टाकले. या गदारोळात वसुंधराराजेंना नुसतीच ‘हूल’ मिळाली आहे हे नक्की!

आपल्या मार्गात जे कोणी अडसर असतील त्यांचा पुरता राजकीय बंदोबस्त करूनच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपश्रेष्ठाRची पूर्ण तयारी दिसत आहे! मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने शिवराज सिंग आणि वसुंधराराजे यांना बाजूला करण्यात आले आहे, त्यावरून दिल्लीकरांचे हे इरादे स्पष्ट झाले आहेत. वास्तविक, मध्य प्रदेशसह छत्तीसगढमध्ये दणदणीत बहुमताने कॉंग्रेसचे सरकार येईल अशी स्थिती आहे. राजस्थानात थोडीफार ‘फाईट’ होईल. मात्र या दोन्ही राज्यांत शिवराजमामा व वसुंधराराजेंना पुन्हा सत्ता मिळू नये, सत्ता गेलेलीच बरी, इतके टोकाचे राजकारण भाजपमध्ये वरच्या पातळीवरून सुरू आहे. कॉंग्रेसच्या वहाणेने राजकीय साप मारण्याचा हा कार्यक्रम आहे. मोदी-शहा जोडीने शिंदे घराण्याचे राजकारण संपवायचेच असा विडा जणू उचलला आहे की काय, अशी शंका घेण्यासारख्या घडामोडी घडत आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवून व शिंदे यांच्या समर्थकांना तिकीट नाकारून दिल्लीकरांनी ज्योतिरादित्य यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तिकीट कापले जाईल या भीतीने ज्योतिरादित्य यांच्या मध्य प्रदेशातल्या आत्या यशोधराराजे यांनी शिवपुरीतून निवडणूक न लढविण्याचा निर्णय स्वतःच जाहीर करत आपली प्रतिष्ठा जपली, तर ज्योतिरादित्य यांच्या राजस्थानातील दुसऱया आत्यांची (वसुंधराराजे) परिस्थिती भाच्यापेक्षा काही वेगळी नाही. एकवेळ मध्य प्रदेश, राजस्थानची सत्ता नाही आली तरी चालेल, मात्र राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा कायमचा काटा काढायचा असे डावपेच सध्या सुरू आहेत. वसुंधराराजे या प्रभावशाली नेत्या असल्या तरी मीडिया दाखवतो तितका त्यांचा प्रभाव नाही. त्या केवळ तीस-चाळीस मतदारसंघांत प्रभाव पाडू शकतात. मात्र त्यांना पर्याय म्हणून आता भाजपकडून राजकुमारी दियाकुमारी यांना बळ दिले जात आहे. अगदी मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची ‘जादू’ चालली नाही आणि सत्ता आलीच तर अश्विनी वैष्णव, गजेंद्रसिंग शेखावत किंवा दियाकुमारी मुख्यमंत्री बनू शकतात असा ठाम दावा राजस्थानच्या एका खासदाराने केला. गेल्या नऊ वर्षांत वसुंधरा यांचे दिल्लीतून व्यवस्थितपणे पंख छाटण्यात आले. वसुंधरांसाठी बंडाची भाषा करणाऱया कैलाश मेघवाल यांची तातडीने भाजपातून हकालपट्टी करून श्रेष्ठाRनी बंडखोरांना सज्जड इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीची ‘ऍंटिइन्कम्बन्सी’ची वाफ विधानसभेच्या ‘प्रेशर कुकर’मधून निघून जावी आणि लोकसभेसाठीचा मार्ग निर्धोक व्हावा असाही एक इरादा यामागे आहे. त्यामुळे धाडसाचे राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. शिवराजमामा व वसुंधरा यांच्यानंतर योगींचा नंबर लागेल, पण त्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत अजून बरेच काही घडायचे आहे.

संजय सिंग यांना काय भोवले?

दिल्लीतील कथित मद्य घोटाळय़ाप्रकरणी ईडीने आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंग यांना अटक केली. यासाठी मद्य घोटाळ्याचे निमित्त दिले असले तरी त्यामागे अदानी प्रकरण असल्याची चर्चा आहे. संसदेत अदानी प्रकरणावर सरकारला धारेवर धरण्यात संजय सिंग आघाडीवर होते. एका अधिवेशनासाठी संजय सिंग यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. तरीही त्यांनी संसद भवनाच्या प्रांगणात निदर्शने केली. संजय सिंग डोकेदुखी ठरत आहेत हे लक्षात आल्यानंतर संजय सिंग यांना केवळ ऐकीव माहितीवर ईडीच्या जाळ्यात अडकविण्यात आले. त्यामागे आणखी एक क्रोनोलॉजी आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर कांग्रेससोबत भाजपचा ‘छुपा समझौता’ झाला आहे. या समझोत्याचे पहिले बळी ठरले ते भाजपचे प्रभारी सुनील देवधर. त्यांची उचलबांगडी केल्यानंतर भाजपने वायएसआरचे खासदार रेड्डी यांचे मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले चिरंजीव राघव यांच्यावर विशेष मेहरनजर दाखवत ‘माफीचा साक्षीदार’ बनवले. राघव यांनी मद्य व्यवहारात अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांच्याशी संजय सिंग यांनी ‘भेट’ घडवून आणली, असा जबाब दिला. केवळ भेट घडवून आणली या तोंडी जबाबाच्या आधारावर ईडीने संजय सिंगांना ताब्यात घेतले असे सांगितले जात आहे.

विजयवर्गीयांचे दुःख

मध्य प्रदेशात अनेक दिग्गजांना विधानसभा निवडणुकीत उतरवून भाजप श्रेष्ठाRनी दिलेल्या धक्क्यातून अनेक जण सावरलेले नाहीत. त्यातील काही जणांनी सार्वजनिकरीत्या मनातला ‘दुखवटा’ व्यक्त केला आहे. त्यापैकी एक कैलाश विजयवर्गीय. शिवराजसिंग चौहान यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे विजयवर्गीय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मात्र त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्याचे दुःख त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले. हेलिकॉप्टरने फिरून अनेक सभा गाजवाव्यात असा माझा इरादा होता. मात्र मलाच गल्लीबोळात मतांसाठी फिरावे लागेल, असे उद्गार विजयवर्गीयांनी काढले. अर्थात विजयवर्गीय सार्वजनिकरीत्या दुःखी असल्याचे दाखवत आहेत त्यामागचे कारण वेगळेच आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यातच विजयवर्गीयांविरोधात निवडणूक लढविणारे कॉग्रेसचे विद्यमान आमदार संजय शुक्ला हे त्या भागात लोकप्रिय आहेत. विजयवर्गीयच काय, शिवराजमामांनी जरी माझ्या विरोधात निवडणूक लढविली तरी मीच जिंकेन, असा आत्मविश्वास शुक्लांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपला ‘गेम’ झाला आहे हे समजण्यात चाणाक्ष विजयवर्गींयांना काहीसा वेळच लागला. आता काय, लढा विधानसभा, जिंकलात तर आमदार, हरलात तर घरी!

[email protected]