सत्यार्थी यांचा नोबेल चोरणाऱ्याला अटक

सामना ऑनलाइन । नवी दिल्ली

कैलाश सत्यार्थी यांच्या दिल्लीतील घरातून नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि प्रमाणपत्र चोरल्याप्रकरणी राजन उर्फ नाटा नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. राजनची चौकशी सुरू आहे.

सत्यार्थी यांच्या मुलाने दिल्ली पोलिसांकडे ७ फेब्रुवारी रोजी दागिने, नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि प्रमाणपत्र अशा मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार केली होती. कालकाजी परिसरातील अरावली अपार्टमेंट येथे सत्यार्थी यांचे घर आहे. या घराचे कुलुप तोडून चोरी करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला होता. या प्रकरणात तपास करुन पोलिसांनी राजन उर्फ नाटा नावाच्या व्यक्तीला अटक केली.

कैलाश सत्यार्थी मागील ६० वर्षांपासून देशातील लहान मुलांना प्रामुख्याने अनाथ तसेच रस्त्यावर जगणाऱ्या गरीब मुलांना चांगले जीवन मिळावे यासाठी समाजकार्य करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ८० हजार पेक्षा जास्त मुले आज चांगले जीवन जगत आहेत. सत्यार्थी यांच्या या कार्याचा नोबेल समितीने २०१४चा नोबेल पुरस्कार देऊन गौरव केला होता. कैलाश सत्यार्थी यांनी त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार देशाला समर्पित करुन राष्ट्रपतींच्या ताब्यात दिला होता. तेव्हापासून सत्यार्थी यांचा मूळ नोबेल पुरस्कार राष्ट्रपती भवन येथेच आहे. नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि प्रमाणपत्र सत्यार्थी यांनी त्यांच्या घरी ठेवले होते.