दिल्लीत आरोग्य आणीबाणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

घातक वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये अक्षरशः ‘आरोग्य आणीबाणी’ लागू करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या असून लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. खेळाची मैदाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच १९ नोव्हेंबर रोजी होणारी मॅरेथॉन स्पर्धाही रद्द होणार आहे. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. २० उड्डाणे मंगळवारी रद्द करण्यात आली. दरम्यान, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून नायट्रोजन ऑक्साइड वाढले आहे. यामुळे लोकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास, फुफ्फुसाचे आणि हृदयाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश आहे. दरवर्षी हिवाळ्यात दाट धुके आणि वायूप्रदूषणात वाढ होते. परंतु या वर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच धुक्याची दाट चादर राजधानीवर पसरली आणि त्यातच वायुप्रदूषणाची पातळी कमालीची वाढल्यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा बंद राहणार – केजरीवाल
राजधानीतील शाळा बंद ठेवण्यात येतील. याबाबत शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांना सूचना दिल्या आहेत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मॅराथॉन स्पर्धादेखील रद्द करण्यात येईल असे ते म्हणाले.

हृदयाचे, अस्थमाचे आजार वाढणार
– या भयंकर वायूप्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसण्याचा धोका आहे.
– पूर्ण काळजी न घेतल्यास राजधानीत श्वास घेताना त्रास होऊन अनेकांना हृदयाचे विकार आणि अस्थमाचे आजार वाढण्याची भीती असल्याचे ‘आयएमए’ने व्यक्त केली आहे. फुप्फुसाचे गंभीर आजार वाढण्याचा धोका आहे.
हरित लवादाने फटकारले
वायूप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना का केल्या नाहीत? आणीबाणीसारख्या परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे, असे राष्ट्रीय हरित लवादाने फटकारले आहे. दिल्ली सरकारसह हरयाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीसही बजावली आहे.

रनिंग सोडा; साधे चालणेही घातक – आयएमए
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी राजधानीत लोकांनी रनिंग करणे सोडा साधे चालणेही आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, शाळा तत्काळ बंद कराव्यात. शाळा-कॉलेजमधील मैदाने, इतर खेळांची मैदाने बंद ठेवावीत अशा सूचना डॉ. अग्रवाल यांनी केल्या आहेत. १९ नोव्हेंबरची हाफ मॅरेथॉन रद्द करावी, असेही त्यांनी सांगितले.

धुके, धूळ आणि विषारी वायू
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एअर क्वालिटी खतरनाक असल्याचे म्हटले आहे. एअर क्वालिटी इंडेक्स १०० हा साधारण मानला जातो, मात्र दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून हा इंडेक्स ३०० आहे.

– इंडिया गेट, राजपथ, आर. के. पुरम, आनंदविहारसह अनेक भागांत प्रदूषणात कमालीची वाढ झाली.
– पोल्युशन मॉनिटरिंग स्टेशननुसार हवेचा दर्जा पीएम २.५ ते पीएम १५० पर्यंत वाढला आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा दर्जा पीएम २.५ ते पीएम २५ पाहिजे.