राजीव गांधी पुण्यतिथी दिवशी राहुल-प्रियंका झाले भावूक

89

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावूक झाले. दोघांनीही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. हरीवंशराय बच्चन यांची ‘वृक्ष हो भले खडे’ ही कविता प्रियंका यांनी शेअर केली. आप हमेशा मेरे हिरो रहेंगे असे प्रियंकाने ट्विटमध्ये म्हटले. प्रियंका यांनी आपल्या ट्विटमधून एक राजनैतिक संदेश दिल्याची चर्चा दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती.

राहुल गांधी यांनीही वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. माझे वडील अत्यंत नम्र, दयाळू होते. त्यांनी मला प्रेम करणे आणि सर्वांचा सन्मान करणे शिकवले. कधीच कुणाचा तिरस्कार करू नको. माफ करायला शिक असे ते सांगायचे. त्यांची आज मला खूप आठवण येत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी वीरभूमी येथे जाऊन राजीव गांधी यांना श्रध्दांजली अर्पण केली.

नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी यांना आदरांजली
दिवगंत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी ट्विट करून मोदी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. ‘दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतींना मी वंदन करतो.’ असे ट्विट मोदी यांनी केले. 1991 मध्ये तमिळनाडू येथे प्रचारसभेवेळी राजीव गांधी यांची श्रीलंकेच्या लिट्टेच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करून हत्या केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या