राहुल गांधी मानसरोवर यात्रेला जाणार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्वत: ला शिवभक्त म्हणवणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ३१ ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेवर जाणार आहेत. कर्नाटक निवडणूका दरम्यान राहुल यांच्या विमानाला दुर्घटना होता होता टळली होती. त्यावेळी राहुल यांनी शिवाची आराधना केली होती व निवडणूका झाल्यानंतर कैलास मानसरोवरला दर्शनाला येईन असा नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठीच राहुल यात्रेला जाणार आहेत.

सध्या राहुल केरळच्या दौऱ्यावर आहेत . तेथील पूरग्रस्त भागांची ते पाहणी करत आहेत. केरळहून आल्यानंतर ते लगेचच यात्रेस रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे राहुल कैलास मानसरोवरला नेपाळ मार्गे नाही तर चीनमार्गे जाणार आहेत.

गुजरात निवडणूकांच्या दरम्यान राहुल यांनी आपण शिवभक्त असल्याचे सांगितले होते. ते प्रत्येक मंदिरात जाऊन देवदर्शनही करत होते. गुजरात निवडणूक प्रचारावेळी व पत्रकार परिषदेत त्यांनी गळ्यात रुद्राक्षाची माळही घातली होती.

एप्रिलमध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जन-आक्रोश रॅलीमध्ये राहुल यांनी विमान प्रकरणाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, मी दोन तीन दिवसांपूर्वी विमानाने कर्नाटकला जात होतो. त्यावेळी अचानक विमान ८ हजार फूट खाली आले. याप्रसंगामुळे मी पुरता हादरलो होतो. त्यावेळी मला कैलास मानसरोवर व भगवान शिव आठवले. यामुळे मी तुमच्याकडे १०-१५ दिवसांची सु्ट्टी मागतोय.जेणेकरुन मी कैलास मानसरोवर यात्रेला जाऊ शकेन.

summary-delhi-rahul-gandhi-will-go-on-kailash-mansarover