भाजप नेत्यावर चप्पल फेकली; एक जण ताब्यात

3
bjp-pc-delhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात लोकसभेची निवडणूक सुरू असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीने भाजप नेत्यावर चप्पल फेकली. या घटनेनंतर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र असे करण्यामागचे कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव हे आज भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत होते. ते बोलत असतानाच पत्रकारांसोबत बसलेल्या एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर चप्पल फेकली. घटना घडताच उपस्थित कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याला बाहेर नेण्यात आले. या व्यक्तीचे नाव भार्गव असून हा कानपूरचा रहिवासी असल्याचे कळते, मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच त्याने चप्पल का फेकली याचे कारण देखील स्पष्ट झालेले नाही. मात्र हा सारा गोंधळ वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.