धूम्रपान त्वचेसाठीही धोकादायक, होऊ शकतो सोरायसिस

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

धूम्रपानामुळे कॅन्सर होऊ शकतो हे आपल्याला माहीतच आहे. पण धूम्रपान त्वचेसाठीही धोकादायक असून त्यामुळे सोरायसिस सारखा त्वचाविकार होऊ शकतो असे तज्ज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. जगात एकूण 12.5 कोटी लोक सोरायसिस या त्वचाविकाराने ग्रस्त असून यातील बहुतेक रुग्णांना धूम्रपानामुळे सोरायसिस झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकट्या हिंदुस्थानमध्ये चार ते पाच टक्के लोकं सोरायसिसने पीडित आहेत. पण सोरायसिस होण्याचे केवळ एकच कारण नसून यामागे अनेक कारणेही असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर एखाद्या व्यक्तिच्या घरात कोणाला सोरायसिस झालेला असेल तर भविष्यात त्या घरातील दुसऱ्या व्यक्तिलाही त्याचा धोका संभवतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट वेनेरीयोलॉजिस्टसचे ( आयएडीवीएल) हिंदुस्थानमधील संयोजक डॉक्टर अबीर सारस्वत यांनी देखील यास दुजोरा दिला आहे. सिगारेटमध्ये निकोटीन असते. जो त्वचेखालील रक्ताभिसरणास अडथळा निर्माण करतो. परिणामी त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा परिणाम त्वचेखालील पेशींवर होतो आणि सोरायसिस होतो.

या आजारात त्वचा लाल होते. त्याच्यावर पांढरे चट्टे निर्माण होतात. हा त्वचाविकार डोकं, हाताचा कोपरा,गुडघे, आणि पोटावरील त्वचेवर होतो. स्किन बायोप्सी किंवा स्क्रॅपिंग करून त्याचे निदान केले जाते. असे असले तरी आता या आजारावर अनेक उपचारही उपलब्धही आहेत. तसेच स्थूल व्यक्तींना अधिक घाम येत असल्याने त्यांना सोराययिस होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्ती या विकाराने ग्रस्त आहेत. त्यांची त्वचा फाटते, त्यातून रक्तस्त्राव होऊ लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या