लैंगिक छळाच्या जलद तपासासाठी स्पेशल किट्स

2
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बलात्कार वा लैंगिक छळाच्या तपासात दिरंगाई होऊ नये यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 3100 पेक्षा अधिक स्पेशल किट्सचे वाटप केल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. हे किट्स पोलीस ठाण्यांमध्ये देणार असून या किट्समुळे रक्त किंवा वीर्याचे नमुने यांसारखे पुरावे गोळा करून तपास जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

द सेक्शुअल असॉल्ट एव्हिडन्स कलेक्शन किट्स किंवा रेप इनव्हेस्टिगेशन किट्स यामुळे अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांना पुरावे गोळा करायला मदत होईल. त्यामुळे तपासाचा वेग वाढेल आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल. 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 हजार 640 पोलीस स्टेशन आहेत. त्यांना रेप इन्व्हेस्टिगेशन किट्स पुरवले जातील. किट्समध्ये टेस्ट टय़ूब्ज आणि बाटल्यांचा सेट आहे. गुह्याच्या ठिकाणाहून पुरावे कसे गोळा करायचे याबाबतच्या सूचनाही या किट्सवर लिहिण्यात आल्या आहेत. हे किट प्रयोगशाळेत पाठवून दोन महिन्यांच्या आत अहवाल मिळवता येऊ शकेल.

तपास अधिकारी, डॉक्टरांना प्रशिक्षण पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱयांना किट्स कसे वापरावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 2575 तपास अधिकारी, 1648 सरकारी वकील आणि 927 डॉक्टर यांना पद्धतशीररीत्या पुरावे कसे गोळा करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महिलांवरील गुह्यांचे प्रमाण वाढले
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2015 मध्ये बलात्काराचे 34651 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. 2016 मध्ये हा आकडा 38,947 वर पोहोचला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना 2015 मध्ये 3,29,243 एवढय़ा होत्या, त्या 2016 मध्ये 3,38,954 इतक्या झाल्या होत्या.