दिल्लीचा चोर मुंबईच्या पावसात अडकला अन् पकडला गेला

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतून लाखो रुपयांची चोरी करून मुंबईत पळून आलेल्या एका चोराला पकडण्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने फार मोठी मदत केली. हा चोर चोरीच्या पैशांच्या जिवावर मौजमजा करण्यासाठी मुंबईत आला, पण पावसाने मुंबई ठप्प झाल्याने त्याला हॉटेलबाहेर पडणे शक्य झाले नाही. पोलिसांनी मोबाईलवरून लोकेशन ट्रेस करून अखेर या चोराच्या मुसक्या आवळल्या.

दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते रामेश्वर प्रसाद चौरसिया यांच्या शासकीय निवासस्थानातून ५० हजार रुपये आणि सोन्याचे नाणे, दोन अंगठय़ा, एक साखळी, सोन्याचे घडय़ाळ, मोबाईल असा ऐवज चोरीला गेला होता. नवी दिल्लीचे डीसीपी मधुर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार६ जुलैला रामेश्वर चौरसिया यांनी साऊथ एव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चोरीच्या घटनेनंतर त्याच्या घरातील नोकर विजय प्रकाश यादव हादेखील गायब होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस केला असता त्याचे लोकेशन मुंबईत दाखविण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने लोकेशनवरून विजयला पकडण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत तो तेथून निघून गेला होता.

पुन्हा ९ जुलैला विजयला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पण तुफान पावसामुळे पोलीस वापीमध्येच अडकले होते. अखेर १० जुलैला पोलिसांनी विजयच्या मुसक्या आवळल्या. मुंबईतील एका हॉटेलमधून त्याला पकडण्यात आले. या हॉटेलमधूनही विजय बाहेर पडण्याच्या तयारीत होता. पण पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने त्याला बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र तोवर पोलीस त्या हॉटेलमध्ये पोहोचले व विजयला अटक करण्यात आली.