इतिहास घडला, रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाची दिल्लीवर मात

सामना ऑनलाईन । इंदूर

चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदर्भाच्या क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. इंदूरच्या होळकर मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने दिल्लीच्या बलाढ्य संघाचा ९ विकेट राखून पराभव केला. रणजीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचणाऱ्या या संघाने लढत जिंकून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पहिल्या डावात ५४७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव फक्त २८० धावांत गुंडाळला. त्यानंतर विजयासाठीचे २८ धावांचे माफक आव्हान फैज फजलचा गडी गमावत पूर्ण केले. संजय रामस्वामी (९) आणि वासीम जाफर (१७) नाबाद राहिले.

विदर्भाने सोमवारी ७ बाद ५२८ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. विदर्भाचे शेवटचे तीन फलंदाज आज झटपट बाद करण्यात दिल्लीला यश आले. रविवारी १३३ धावांवर नाबाद असलेला अक्षय वाडकर त्याच धावसंख्येवर बाद झाला. तर सिद्धेश नेरळने कालच्या ५६ धावांमध्ये आणखी १८ धावांची भर घातली. विदर्भाचा डाव झटपट गुंडाळल्याचा आनंद दिल्लीच्या संघाला जास्त वेळ उपभोगता आला नाही.

दिल्लीच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर चंडला फक्त ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर शौरी (६२) आणि राणाने (६४) धावा काढत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांव्यतिरीक्त इतर खेळाडूंच्या अवसानघातकी फलंदाजीमुळे दिल्लीचा डाव २८० धावांत संपुष्टात आला. विदर्भाकडून अक्षय वाखरेने ४, आदित्य सारवतेने ३, पहिल्या डावात बळींचा षटकार मारणाऱ्या गुरबनीने २, तर सिद्धेश नेरळने एक बळी घेतला.

धावफलक –

दिल्ली – पहिला डाव सर्व बाद २९५ धावा
विदर्भ – पहिला डाव सर्व बाद ५४७ धावा
दिल्ली – दुसरा डाव सर्व बाद २८० धावा
विदर्भ – दुसरा डाव १ बाद ३२ (९ विकेटने विजय)