दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा ऑड-इव्हन पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ऑड-इव्हन पॅटर्न राबवण्यात येणार आहे. याआधी २०१६मध्ये दिल्लीत दोन वेळा ऑड-इव्हन पॅटर्न लागू करण्यात आला होता. पहिल्यांदा १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६पर्यंत आणि दुसऱ्या वेळेस १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०१६पर्यंत हा पॅर्टन लागू करण्यात आला होता. अशाप्रकारे दिल्लीकरांनी मागच्या वर्षी दोनदा या पॅर्टनचा अनुभव घेतला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येसंदर्भात केजरीवाल सरकारला फटकारले असून त्यासोबतच केंद्र सरकारलाही राष्ट्रीय हरित लवादाने सुनावले आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हेलिकॉप्टरने कृत्रिम पाऊस का पाडत नाही, असाही प्रश्न एनजीटीने सरकारला विचारला आहे.

सरकारचा हा नियम लागू झाल्यानंतर १,३,५,७,९ (ऑड नंबर) या विषम संख्या ज्या गाड्यांच्या क्रमांकामध्ये शेवटी असतील त्या गाड्या विषम तारखांना रस्त्यावर धावणार आणि २,४,६,८,० (इवन नंबर) या या सम संख्या ज्या गाड्यांच्या क्रमांकामध्ये शेवटी असतील त्या गाड्या सम तारखांना रस्त्यावर धावतील. थोडक्यातच सांगायचे झाले तर दिल्लीकरांना आता आपली गाडी एकदिवसाआड रस्त्यावर चालवता येणार आहे. म्हणजेच आता महिन्यातील १५ दिवसच गाडी रस्त्यावर चालवता येईल.