दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका असल्याचे उघड झाले आहे. दिल्लीतील वातावरणातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली आणि गुरुग्राममधील हवेचे नमुने घेण्यात आले होते. त्याच्या तपसणीतून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. दिल्लीतील हवेत मँगेनीज, निकेल आणि लेड यासारखे तीन विषारी घटक आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोकाही निर्माण होऊ शकतो. लंग केअर फाउंडेशन या स्वंयसेवी संस्थेने या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.

वाढती थंडी आणि धुक्यामुळे दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीतील हवेत श्वास घेणे कठीण असून अशा वातावरणात राहणे धोकादायक सिद्ध होऊ शकते, असा निष्कर्षही हवेच्या नमुन्यातून वर्तवण्यात आला आहे.

दिल्ली, गुरुग्रामसह सात ठिकाणच्या हवेचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच नमुन्यांमध्ये मँगेनीजचे प्रमाण जागतिक प्रदूषणाच्या मानकापेक्षा खूप जास्त आहे. तर सातही नमुन्यांमध्ये निकेलचे प्रमाण जास्त आहे. सहा नमुन्यांमध्ये लेड प्रमाण जास्त होते. हवेतील हे तीन घटक आरोग्याला हानिकारक असून त्यामुळे ब्रेन डॅमेजचा धोका असतो. हवेतील लेडच्या वाढत्या प्राणामुळे लहान मुलांच्या आयक्यू, स्मरणशक्ती, व्यवहार आणि शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होण्याचा धोका असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.