कमला मिल प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

सामना प्रतिनिधी । मुंबई

कमला मिल अग्निकांड प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे. या घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज विविध याचिका दाखल झाल्या. ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस ब्रिस्त्रा’ पब आगीची सीबीआय चौकशी करण्यात यावी, पब मालकांसह महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱयांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या याचिकांद्वारे करण्यात आल्या. या सर्व याचिकांवर येत्या गुरुवारी ४ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

पबमालक आणि चालक तसेच महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागून १४ जणांचे बळी गेले असा आरोप विधी शाखेचा विद्यार्थी गर्व सूद आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर  यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत करण्यात आला आहे. कमला मिलच्या मालकालाही त्यात जबाबदार धरण्यात आले असून हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सुपूर्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या अग्निकांडातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करावी अशीही मागणी आहे.

रमेश गोवानी हाजिर हो!

अग्निकांडानंतर गायब झालेला कमला मिलचा चेअरमन रमेश गोवानी याला आज मुंबई पोलिसांनी समन्स जारी केले. बेकायदा बांधकाम तसेच सदोष मनुष्यवधाच्या गुह्यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश गोवानीला पोलिसांनी दिले आहेत. दुसरीकडे ‘वन अबव्ह’ पबचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर हे तिघे अटक टाळण्यासाठी पोलिसांवर विविध मार्गाने दबाव टाकत असल्याचे वृत्त आहे.